लोकशाही संपादकीय लेख
फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला महाराष्ट्रात तसेच संपूर्ण भारतभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे गुरुवार दिनांक १३ मार्च रोजी होळी पेटवून गुळाचा नैवेद्य अग्नीला दाखवून प्रज्वलित अग्नीची पूजा केली जाते. दुसऱ्या दिवशी म्हणजे १४ मार्च रोजी रंगांची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रात होळीच्या सणाला शिमगा म्हटले जाते आणि रंगोत्सवाला रंगपंचमी म्हटले जाते. महाराष्ट्रातील आदिवासी भागातील आदिवासी समाजामध्ये होळी सण पारंपारिक पद्धतीने मोठ्या धुमदामित साजरा केला जातो. त्याला एक प्रकारे अध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. होळी पेटवताना त्या अग्नीमध्ये अनेक प्रकारच्या वाईट गोष्टींना दहन करण्याचा संकल्प आपण करूया.
नकारात्मकतेला तीलांजली देऊन अध्यय सकारात्मकतेचा आत्मसात करण्याची आज खरी गरज आहे. होळीच्या अग्नीमध्ये नकारात्मकतेचे दहन केले तर सकारात्मकतेतून अनेक चांगल्या गोष्टी आपण साध्य करू शकतो. म्हणून होळीच्या अग्नीत नकारात्मकतेला जाळून टाका. महाराष्ट्रात तसेच देशात भ्रष्टाचार बोकाळाला आहे. या भ्रष्टाचाराला होळीच्या अग्नीत दहन करण्याचा संकल्प आपण करूया. त्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्याला आणि भ्रष्टाचार करण्याची साथ देणाऱ्याला या होळीनिमित्त आपण धडा शिकवू या भ्रष्टाचार करणार नाही आणि भ्रष्टाचाराला साथ देणार नाही हा संकल्प आपण होळीपासून केला तर भ्रष्टाचाराची मुक्ती व्हायला वेळ लागणार नाही अलीकडे गुन्हेगार आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे. या गुन्हेगार प्रवृत्तीला होळीत दहन करून करूया. त्यानंतर गुन्हेगारांकडून होणारे अन्याय, अत्याचार होणार नाहीत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. राज्याचे तसेच देशातील राजकारणी अत्यंत खालच्या स्तराला जात आहेत. राजकारणातून समाजकारण म्हणजे समाजाची सेवा करण्याचे एक साधन. मात्र हे राजकारण अत्यंत खालच्या स्तराला गेलेले आहे.
आदर्श लोकशाहीत राजकारण कसे असले पाहिजे? हे आता राहिलेले नाही. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीला प्रचंड असे बहुमत मिळाले. एवढे प्रचंड बहुमत मिळाले की, विरोधक नावालाच शिल्लक राहिले. म्हणून महाराष्ट्रातील महायुती सरकार अत्यंत प्रभावीपणे राज्य करून सर्वसामान्य जनतेला आपले वाटावे अशी कामगिरी होईल. तथापि उलटेच झाले. २८८ आमदारांची संख्या असताना विधानसभेत २३७ इतके प्रचंड आमदारांचे बहुमत असताना महायुतीतील नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव उघड होत आहे. बीड जिल्ह्यातील एक सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या झाली. संतोष देशमुख यांना ज्या राक्षसी प्रवृत्तीतून मारहाण झाली, त्याचे फोटो दिमाखाने काढणाऱ्या हल्लेखोरांना थोडीही लाज वाटली नाही. व्हायरल झालेले फोटो पाहिले की काळीज असणाऱ्यांकडून उद्रेकच होईल. या आरोपींना पाठीशी घालणाऱ्या मंत्री महोदयांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तीन महिने लावले. बीड जिल्ह्याचा बिहार झाला आहे, अशी आर ओरड सत्ताधाऱ्यांपासून विरोधकांपर्यंत सर्वच करत आहेत. परंतु आपले राजकारण साधण्यासाठी सत्ताधारी त्यावर काहीच बोलत नाहीत. मयत संतोष देशमुख यांची बारावीला असलेली मुलगी वैभवी आपल्या वडिलांच्या हत्ये संदर्भात न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन टाहो फोडून सांगते आहे. तथापि आमच्या राजकारण्यांना पाझर फुटत नाही. त्यासाठी होळीच्या सणानिमित्त अशा राजकारणाला धडा शिकविण्याचा संकल्प करूया.
हिंदू धर्मामध्ये अनेक सण उत्सवांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. केशवसुतांची कविता आहे. त्यात ते म्हणतात, ’जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका’. वाईट गोष्टीची आपण आता होळीच केली पाहिजे. होळीमध्ये त्यांचे दहन केले पाहिजे. सध्या विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पावर होणाऱ्या चर्चा पाहिल्या ऐकल्या की, “मतदारांनी यासाठी आमदारांना निवडून पाठविले आहे काय?” असा प्रश्न पडतो. अर्थसंकल्पात खानदेशाला स्थानच नाही. जळगाव जिल्ह्यातील वाळू माफियांचा वाढलेला हैदोस चिंताजनक आहे. त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे, असे एक ज्येष्ठ आमदारांनी मुद्दा उपस्थित केला. तर सत्ताधारी ज्येष्ठ आमदार मंत्र्यांकडून ज्या पद्धतीने उत्तर दिले जाते त्यावरून या दोघांमध्ये वैयक्तिक उखाड्या पाखाड्या काढल्या जातात. यासाठी हे विधानसभा गृह आहे का? आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी चर्चा करण्यासाठी अथवा आरोप प्रत्यारोप करण्यासाठी विधानसभा अधिवेशनाचा जणू दुरुपयोगच केला जातो आहे. विधान परिषदेचे अध्यक्ष तसेच सभागृहातील सर्व सदस्य मूकपणे हे सर्व पहात राहतात. हे सर्व जनतेच्या पैशाचा दुरुपयोग नाही का? होळीच्या सणानिमित्त अशा प्रवृत्ती होळीत दहन करण्याचा आपण सर्वसामान्य जनता संकल्प करूया. तरच आमचे लोकप्रतिनिधी टाळ्यावर येतील अन्यथा स्वार्थासाठी हा हैदोस चालूच राहील…!