लोकशाही विशेष लेख
आपण पाहतो की, आजकाल प्रत्येकाचंच आयुष्य इतकं धावपळीचं, धकाधकीचं झालं आहे की, माणसाला स्वतःकडे साधं पहायला देखील वेळ नाही इतका प्रत्येकजण आपापल्या जबाबदारीच्या ओझ्याखाली दबला गेलेला आहे, गुरफटलेला आहे.
पूर्वीसारखी परिस्थिती आता राहिलेली नाही, काळ बदलला तशा कालानुरूप ब-याच गोष्टीही बदलल्या. काही गोष्टींना महत्त्व प्राप्त झालं तर काही गोष्टी या कालबाह्य झाल्याचंही चित्र दिसून येतं! पूर्वी माणसाच्या गरजा या मर्यादित स्वरुपाच्या होत्या त्यामुळे आहे त्यात लोक आनंदी, समाधानी होते नि माणूस मोकळा श्वास घेऊ शकत होता.
परंतु आज मात्र हे चित्र बदललेलं सातत्यानं दिसून येतं म्हणजे आज लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचीच धावपळ इतकी वाढली आहे की, ज्याचं नाव ते! आणि ती करणं देखील तितकंच क्रमप्राप्त झालं आहे कारण मुलांची शिक्षणं, त्यांच्या शाळेच्या, क्लासच्या फीज, तसेच घराचे हप्ते फेडणं यातच माणसाचं अर्ध – निम्मं आयुष्य खर्ची पडत चाललंय, अगदी सर्रास असंच चित्र सगळीकडे आपल्याला पहायला मिळतं! लहान मुलांचंही आपण पाहतो की शाळा, क्लास, फिजिकली फीट राहण्यासाठी एखादा खेळ शिवाय स्पर्धा इतकी वाढली आहे की, त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इथे प्रत्येकजण आटोकाट प्रयत्न करीत असतो.
येणारा प्रत्येक दिवस तितक्याच गतीनं पुढे सरकत चाललाय आणि अशा या बिझी आणि टाईट शेड्युलमुळे माणसाच्या आयुष्यातील आनंद, समाधान कुठेतरी लोप पावत चाललंय, त्याचा -हास होत चाललाय असं प्रकर्षाने जाणवतं. त्यामुळे मित्रांच्या म्हणा वा नातेवाईकांच्या प्रत्यक्ष भेटीचा योगही दुर्मिळ होऊ लागला आहे, “मोबाईल” हे आजच्या काळातील तुमच्या – आमच्या संवादाचं साधन होऊन बसलंय.
परंतु या ही परिस्थितीत एक आशेचा किरण म्हणून आपण आपल्या आवडीचा एखादा छंद जोपासला तर आपलं आयुष्य निश्चितच ख-या अर्थाने अजून सुकर बनू शकतं! जसं की लेख/ कविता वा लिखाणाची आवड असेल तर तो छंद जोपासला जाऊ शकतो, कोणाला गायनाची आवड असते, कोणाला छान, हुबेहूब चित्रं काढता येऊ शकतं, कोणाला बागकामाची आवड असू शकते वा याव्यतिरिक्त ही आपले काही वेगळे छंद असतील तर आपण निश्चितच ते जोपासू शकतो.
यातून आपल्याला एक वेगळाच मानसिक आनंद, आत्मिक समाधान मिळू शकतं, आपल्या विचारांची कक्षा रुंदावते, आपले विचार नि माणूस म्हणून आपण अधिक प्रगल्भ होतो तसेच आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण होते, जगाचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो! असे बरेच सकारात्मक बदल आपल्यात आपण एखादा छंद जोपासून नक्कीच घडवून आणू शकतो तसेच त्यामुळे आपल्या आयुष्याला एक प्रकारची स्थिरता प्राप्त होते! तसेच आपल्या समोर आलेल्या कोणत्याही अडचणींचा सामना आपण अधिक सक्षमपणे करु शकतो.
खरंच कोणताही छंद माणसाचं आयुष्य घडवायला फार उपयोगी पडू शकतो त्यामुळे माणसाच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळते! म्हणूनच प्रत्येकाने आयुष्यात एक तरी आपल्या आवडीचा असा छंद निवडावा, जोपासावा जेणेकरून त्यामुळे आपला ताण – तणाव दूर व्हायला निश्चितच मोलाची मदत होईल तसेच त्यातून मिळणारा आनंद नि समाधान हे चिरकाल टिकेल.
लता गरगटे-चौधरी
पुणे