ठाण्यात हिट अँड रन : मनसे आक्रमक

३६ तास झाले अद्याप शोध लागला नाही

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

ठाण्यात हिट अँड रनची घटना घडली आहे. ठाण्यात एका भरधाव वेगाने आलेल्या कारने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार हा खाली कोसळला. त्याला गंभीर दुखापत झाली. मात्र त्याची मदत न करता तो कारचालक तेथून फरार झाला. या दुर्घटनेत 21 वर्षांच्या दर्शन शशिधर हेगडे तरूणाचा मृत्यू झाला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ठाण्यातील हिट अँड रन प्रकरणी आता मनसेने आक्रमक पावित्रा घेतला.

मनसे नेते अविनाश जाधव आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आज ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ लक्ष द्या. सध्या पब संस्कृतीची वाढली आहे. त्यामुळे त्याला आळा घालायला हवा, असे अविनाश जाधव यांनी म्हटले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा अपघात कसा झाला, याचीही माहिती दिली.

 

“ज्या वेळेला हा अपघात झाला, त्यावेळेस ती गाडी थांबली असती तर तो मुलगा जिवंत असता. तो मुलगा तडफडत पडला होता, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. अशा नराधमाची अजिबात सुटका व्हायला नको. या घटनेला 36 तास उलटून गेले आहे. मात्र अजून त्याचा शोध लागलेला नाही. याप्रकरणी गाडी सापडली आहे, असे पोलीस सांगत आहेत. पण पोलीस स्थानकात कुठलीही गाडी दिसत नाही. त्यामुळे पोलिसांनी या गुन्ह्याकडे गंभीररित्या पाहायला हवे. तसेच याप्रकरणी तात्काळ लक्ष द्यायला हवं”, असे अविनाश जाधव म्हणाले.

“जर त्या मुलाच्या आईला न्याय मिळवून द्यायचा असेल, तर त्याला पकडायला हवं. ज्यावेळेस अपघात झाला त्यावेळेस त्याने गाडी एका ठिकाणी पार्क केली आणि फोन बंद करून गायब झाला आहे. तो क्रिमिनल माईंड असावा अशी माझी धारणा आहे. त्यामुळे अशा माणसाला बाहेर ठेवणं, हे धोकादायक आहे. त्याला ताबडतोब अटक करायला हवी”, अशी माझी मागणी आहे.

 

“जर आज संध्याकाळपर्यंत याबद्दल कोणताही निर्णय झाला नाही, तर लोक आक्रमक होतील आणि यानंतर पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या आम्ही नक्की करु. आमचा संपूर्ण पक्ष त्यांच्यासोबत असणार आहे”, असे अविनाश जाधव यांनी म्हटले.

“पोलिसांना थोडा वेळ द्यावा, असे मला वाटतं. मला अपेक्षित आहे की आज संध्याकाळपर्यंत याप्रकरणी काहीतरी कारवाई होईल. जर नाही झाली तर मग शेवटी लोकांना रस्त्यावर उतरावे लागेल. सध्या पब संस्कृतीची वाढली आहे, त्याला आळा घालायला हवा. पोलिसांनी जे नियम बनवले आहेत, ते नीट पाळले गेले तर पब संस्कृती देखील बंद होईल याची खात्री आहे”, असेही अविनाश जाधव यांनी म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.