चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
भद्रावती शहरातील मुख्य बाजारपेठ व हनुमान नगर रोड (जुने वडाचे झाड परिसर) येथे गर्दीच्या वेळेत हायवा व दहा चक्का यांसारख्या जड वाहनांची सर्रास ये-जा सुरू असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चा आक्रमक झाले असून प्रशासनाकडे तात्काळ बंदीची मागणी करण्यात आली आहे.
भाजयुमोचे प्रदेश सचिव इम्रान खान यांनी तहसीलदार, भद्रावती यांना लेखी निवेदन देत गर्दीच्या वेळेत जड वाहनांना शहरात प्रवेशबंदी करण्याची मागणी केली आहे. याशिवाय मुख्य बाजारपेठ हा शहराचा व्यापारी केंद्रबिंदू मानला जातो. सकाळपासून रात्रीपर्यंत मोठ्या प्रमाणावर ग्राहक, व्यापारी, महिला, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांची वर्दळ असते. हनुमान नगर रोड परिसरातही दोन्ही बाजूंना दुकाने असून रस्ता अरुंद आहे. अशा परिस्थितीत जड वाहनांची वर्दळ सुरू असल्याने वारंवार वाहतूक कोंडी होत असून अपघाताचा धोका वाढत आहे.
निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या
- गर्दीच्या वेळेत हायवा व दहा चक्का वाहनांच्या प्रवेशास तात्काळ बंदी, वाहतूक नियंत्रणासाठी पोलिस बंदोबस्त वाढवणे
- नगरपरिषद व संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन अधिकृत आदेश जाहीर करणे
- कायमस्वरूपी वाहतूक नियोजन आराखडा तयार करणे
नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजयुमोच्या वतीने देण्यात आला आहे. दरम्यान, शहरातील व्यापारी व नागरिक प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून असून गर्दीच्या वेळेत जड वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

