लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या दीड महिन्यापासून महाराष्ट्रात पाऊस सरासरीच्या तुलनेत कमी झाला असला तरी आता घाटमाथ्यासह राज्यभरात पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली अनुकूल परिस्थिती आणि हवेतील वाढलेल्या आर्द्रतेमुळे पावसाचा जोर वाढणार आहे. गेल्या वीस दिवसांच्या विश्रांतीनंतर घाटमाथासह मराठवाडा विदर्भातही पावसाला अनुकुल परिस्थिती तयार झाली आहे. त्यामुळे खरीप पिकांची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात, चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. तसेच अरबी समुद्रात वाऱ्याचा वेग वाढला असून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाड्यात सध्या पावसाचे अलर्ट देण्यात आले असून पुणे घाटमाथ्यावरही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय.
राज्यभरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी मुंबईसह मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला होता. आजही बहुतांश भागांमध्ये पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत. रविवारी ( 19 जुलै ) पुणे, अहिल्यानगर यासह बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांना पावसाचे येलो अलर्ट देण्यात आले आहेत. बहुतांश विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यालाही येलो अलर्ट देण्यात आलाय.
सोमवारी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज असून इतर कुठेही अलर्ट देण्यात आलेले नाहीत. 21 जुलै रोजी रायगड, पुणे आणि नाशिक घाटमाथ्यावर पावसाचे येलो अलर्ट देण्यात आले आहेत. तर 22 जुलै रोजी रत्नागिरी रायगड पालघरसह नाशिक आणि पुणे घाटमाथ्यावर पावसाचा अंदाज आहे. जूनमध्ये यंदा उशिरा सुरू झालेला पाऊस अलनिनोच्या सावटामुळे आणखी लांबला. त्यामुळे ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांना आभाळाकडे डोळे लावून पाहण्याची वेळ आली. दुसरीकडे धरणसाठा खालावल्याने पाणीटंचाईचे सावटही घोंगावत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या हलक्या पावसामुळे पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील तीन ते चार दिवस शहरात हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ढगाळ वातावरण कायम राहिल्यास तापमानात आणखी घट होण्याची शक्यता असून नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
वीस दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर अखेर परभणी जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परभणी शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत आज जोरदार पाऊस झाला. गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, कापूस आणि इतर खरीप पिके करपण्याच्या मार्गावर होती. अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकटही निर्माण झाले होते. मात्र आज झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतातील पिकांना नवसंजीवनी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा समाधान दिसून आले असून, आगामी काही दिवसांतही चांगला पाऊस होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता या पावसाची पुढील साथ कायम राहते का, याकडे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


