परभणी, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात 30 ऑगस्टपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे. या काळात पावसाचा जोर कमी राहील. काही ठिकाणी पाऊस उघडीप देणार आहे. पण, ही परिस्थिती थोड्याच दिवसांसाठी राहणार आहे. कारण की सप्टेंबरच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठ्या पावसाची शक्यता आहे.
पंजाबरावांच्या अंदाजानुसार शेतकरी बांधवांनी विशेषता उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांनी 31 ऑगस्टपर्यंत आपली शेतीची कामे उरकून घ्यावीत. कारण की 31 ऑगस्ट नंतर राज्यातील हवामान बदलणार आहे. 1 सप्टेंबर पासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे.
1 सप्टेंबर पासून ते 5 सप्टेंबर पर्यंत तसेच काही ठिकाणी 6 सप्टेंबर पर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत राज्यातील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, हिंगोली, वाशिम, नांदेड, अकोला, अमरावती, बुलढाणा, जळगाव, जळगाव जामोद, लातूर, उस्मानाबाद, कन्नड, वैजापूर, धुळे, संभाजीनगर, नाशिक, सटाणा, मालेगाव या भागात या कालावधीत चांगल्या जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर 2 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहणार आहे. येथे पाऊस पूर्णपणे उघडीप देणार नाही मात्र पावसाचा जोर कमी होईल. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येथेही सुरूच राहणार आहे.