लोकशाही न्यूज नेटवर्क

जून आणि जुलैमध्ये पावसाने म्हणावा तसा जोर धरला नाही. राज्याच्या अनेक भागात पुरेसा पाऊस पडला नाही. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने त्याचा शेतीला काही फायदा झालेला नाही. तर राज्यातील अनेक भाग अजूनही कोरडे ठाक आहेत. मात्र आता मान्सूनची परिस्थिती बदलत आहे. येत्या काही दिवसात राज्यात चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. रत्नागिरीत तर पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे रत्नागिरीत पाऊस जोर धरेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीवर चक्राकार वारे निर्माण झाले आहेत. त्यामुळे किनारपट्टी भागात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. कोकणात सकाळपासूनच सरीवर सरी कोसळत आहेत. पुढील काही तासात कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात आज पासून पुढचे चार दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या चार दिवसात समुद्र देखील खवळलेला राहिल. समुद्रात चार मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे मच्छिमारांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जूनपासून आजपर्यंत सरासरीच्या 50% पाऊस पूर्ण झाला आहे. अजूनही 50 टक्के पाऊस होण्याचा बाकी आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस होणार आहे. हवामान खात्याकडून 22 जिह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. त्याच बरोबर मुंबईला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. राज्यात पाऊस परतला असताना पुढील काही दिवस मुंबईसह संपूर्ण राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
गेल्या चार दिवसापासून मुंबईत रिपरिप पडणारा पाऊस आज थांबला आहे. पावसाची रिपरिप बंद झाली आहे. मुंबईत चांगलं कडकडीत ऊन पडलं आहे. मुंबईची रस्ते वाहतूक सुरळीत आहे. ट्रेनही व्यवस्थित चालू आहे. कुठेही पाणी तुंबलेले नाही. मात्र, मुंबईलाही ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याने मुंबईतील हवामान कधीही बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संध्याकाळपर्यंत पुन्हा मुंबईत पावसाची रिपरिप सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत नुकसानग्रस्त भागातील मदत व पुनर्वसन, पंचनामे, शेती आणि पायाभूत सुविधांचे झालेले नुकसान तसेच नागरिकांना तातडीने दिल्या जाणाऱ्या मदतीबाबत चर्चा होणार आहे.


