लोकशाही न्यूज नेटवर्क
मुंबई, पुणेसह राज्यातील बहुतांश सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तास पावसाचा जोर कायम राहणार आहे. पालघर, रायगड, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापुरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पश्चिमेकडून वाहणारे वाऱ्यांचा जोर आणि तीव्रता अधिक झाल्यामुळे राज्यातील संपूर्ण भागांमध्ये सध्या पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळते आहे. पूर्व विदर्भासह मराठवाड्यातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाऊस चांगला झाल्यामुळे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक वातावरण निर्माण झालं आहे. संपूर्ण मुंबईसह उपनगरात पावसाचा चांगलाच जोर आहे. दक्षिण मुंबई, अंधेरी, बोरिवली, विरार, ठाणे, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबई, पनवेल, भिवंडी, पालघर सगळीकडे रात्रभर पाऊस सुरू आहे. तर पुढील 48 तासानंतर राज्यात पावसाचा जोर कमी होईल, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
वसई-विरारमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची संततधार सुरू असून रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये रस्त्यावर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. नालासोपारा पूर्व परिसरातील गाला नगर येथे रस्त्यावर पाणी साचल्याने रिक्षा आणि इतर वाहनांना पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेऊन पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी आज जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी शाळांची नेहमीची लगबग दिसून आली नाही. मात्र, नोकरदार वर्गाला पावसाची पर्वा न करता पाण्यातूनच कामावर जावे लागत असल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने आज दिवसभर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून नागरिकांनी अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, कासाभगातील जनजीवन विस्कळीत झाला आहे. तर ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्यामुळे रहदारीचे रस्ते हे बंद झाले आहेत. डहाणू शहराला कंक्राडी नदीला आलेल्या पूरामुळे वेढा घातला असून शहरातील बस डेपो इराणी रोड परिसर सागर लॉज परिसरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचला आहे. दुकानांमध्ये पाणी शिरला आहे दुसरीकडे कासा भागामध्ये सुद्धा काही घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती मिळाली असून डहाणू चारोटी,, वाणगाव चिंचणी हे रस्ते पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. तर दुसरीकडे सारणी उर्से ऐना वाणगाव या रोडवर उर्से येथे पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्याने हा रस्ता वाहतुकासाठी बंद झाला आहे. त्यामुळे जवळपास 15 ते 20 गावांचा संपर्क तुटला आहे.
रायगड जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून काळे ढग दाटून आले आहेत. त्यामुळे जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मागीत दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणी पातळीत आता वाढ होऊ लागली आहे. सावित्री आंबा कुंडलिका पाताळगंगा या नद्या सध्या दुथडी भरून वाहत आहेत. आज देखील हवामान विभागाकडून रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊसकोसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.एकीकडे जिल्ह्यातील 28 धरणांपैकी 22 धरणे ही 100 टक्के भरली असून जिल्ह्यात पाण्याची समस्या मिटली आहे. पावसाचा जोर वाढल्यास नागरिकांनी शक्यतो काम असेल तरच बाहेर पडा अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढल्याने पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडली आहे. गेल्या 24 तासात पंचगंगा नदीची पाणी पातळी आठ फुटाने वाढली आहे… सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 31 फूट 4 इंच किती असून जिल्ह्यातील 23 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेकडच्या भागांमध्ये रिमझिम पाऊस सुरू असला तरी पश्चिमेला घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सरासरी 85 ते 90 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळेच धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये देखील झपाट्याने वाढ होत आहे. सध्या राधानगरी धरण 86 टक्के भरले असून धरणांमधून 1400 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे भोगावती आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी देखील वाढली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

