राज्यात मुसळधार पाऊस; जळगावसह या भागांना इशारा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

देशासह राज्यातील अनेक भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे.  तसेच कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  आज म्हणजेच सोमवारपासून १५ सप्टेंबपर्यंत मुंबई-ठाणे परिसरासह संपूर्ण कोकण विभाग, पुणे,नाशिक, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र, विदर्भ तसेच मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तसेच  दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक असेल, अशी देखील माहिती हवामान विभागाने रविवारी दिली.

पावसाला पोषक स्थिती

महाराष्ट्रासह ओडिशा, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, केरळ, कर्नाटक किनारपट्टीच्या भागांमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. मोसमी पावसाची तीव्रता सध्या मूळ आगमनभाग म्हणजे दक्षिणेकडे आहे. त्याचप्रमाणे सध्या ओडिशापासून कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ते उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकत आहे. याशिवाय पूर्व-मध्य अरबी समुद्रात महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीजवळ वाऱ्यांची चक्रीय स्थिती आहे. परिणामी राज्यात मोठ्या प्रमाणावर बाष्प येऊन पावसाला पोषक स्थिती निर्माण होत आहे.

चार-पाच दिवस जोरदार पाऊस

पुणे, महाबळेश्वर, सातारा, सांगली, जळगाव, रत्नागिरी, औरंगाबाद, परभणी, अमरावती, अकोला, ब्रह्मपुरी, वर्धा आदी जिल्ह्यांच्या विविध भागांत कमी-अधिक प्रमाणात पावसाची नोंद झाली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकणात पुढील चार-पाच दिवस तुरळक भागांत जोरदार पाऊस कोसळेल. किनारपट्टीच्या भागाला सोसाट्याचा वारा वाहणार आहे. मध्य महाराष्ट्रातही अनेक भागांत पाऊस जोर धरणार आहे. घाट विभागांत मुसळधारांची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी, तर विदर्भात अनेक भागांत मेघगर्जना आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाचा इशारा 

१२ ते १५ सप्टेंबर या कालावधीत  मुंबई, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यांत काही भागांत मुसळधारांची शक्यता.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या काही भागांत जोरदार पावसाचा इशारा.

१२ ते १५ सप्टेंबरला पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतही  मोठ्या पावसाचा अंदाज, घाट विभागात जोर अधिक.

नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.

अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज.

 

Leave A Reply

Your email address will not be published.