
लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात उष्णता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, पुणे शहरात देखील उष्णतेचा तडाखा वाढला आहे. पुण्यातील तापमान 40 ते 41 अंशावर स्थिर आहे. उष्णलहरींचा उद्रेक सुरूच असून सलग दुसऱ्यांदा लोहगावचा पारा 42 अंशावर पोहोचला होता. तर आजही उष्णता मोठ्या प्रमाणावर जाणवण्याची शक्यता आहे. उद्या आणि परवा पुणेकरांना उन्हापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दि. 18 आणि 19 एप्रिल रोजी पुणे शहर आणि जिल्ह्यात तूरळक पावसाची शक्यता आहे.
राज्यात पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. त्यानुसार मध्य महाराष्ट्रात उद्या दि.18 एप्रिलपर्यंत, मराठवाड्यात 18 एप्रिलदरम्यान, विदर्भात 19 एप्रिलदरम्यान काही ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. विविध भागांमध्ये तापमान लक्षणीय वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने केले आहे. उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांनी भरपूर पाणी व ओआरएस घ्यावे, सैल कपडे वापरावेत. याशिवाय घराबाहेर पडताना टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. सावलीत विश्रांती घ्यावी. ज्येष्ठ, मुलांची काळजी घ्यावी. दुपारी 12 ते 4 या वेळेत उन्हात जाणे टाळावे, अतिथंड किंवा उष्ण पदार्थ टाळावे. लहान मुले किंवा प्राण्यांना उन्हात पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन कार्य केंद्राने केले.
हलक्या पावसाची शक्यता
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 18 ते 21 एप्रिलदरम्यान ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसासह मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. राज्यात कमाल तापमानात विशेष बदल होणार नाही. मात्र, 19 ते 22 एप्रिलदरम्यान तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होण्याचा अंदाज आहे.

