मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान रोज नवे उच्चांक गाठत आहे. अशातच हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. रविवार दि. 16 मार्च रोजी ही लाट अधिक तापदायक ठरणार आहे. सर्व जिल्ह्यातील उष्णतेच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे. परिणामी संभाव्य उष्णतेची लाट लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन ही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
राज्यातील जवळ जवळ सर्व जिल्ह्याचा पारा हा 40 डिग्रीच्या पार पोहचला आहे. अशातच आज अनेक जिल्ह्यात 41.4 डिग्री सेल्सियस इतके तापमान नोंदविण्यात आले आहे. आगामी काळात हेच तापमान सामान्यपेक्षा 3 ते 4 डिग्रीने पारा वाढणार असल्याचे ही सांगितले जात आहे. साधारण 35 अंशांच्या पलीकडे तापमान हे मार्च महिन्याच्या शेवटाला असते. मात्र उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तापमानाने सामान्यपेक्षा अधिक पारा गाठल्याने आगामी काळात उष्णतेने शहरे आणखी तापण्याची शक्यता आहे. परिणामी हवामान विभागाने आगामी काळासाठी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हे करा उपाय..
* तहान लागली नसली तरी पुरेसे पाणी प्या.
* हलके, सौम्य व फिक्या रंगाचे, सैल आणि सच्छिद्र सुती कपडे घाला.
* उन्हात बाहेर जाताना संरक्षक गॉगल, छत्री, टोपी, बूट किंवा चप्पल वापरा.
* प्रवासात पाणी सोबत ठेवा.
* मद्यपान, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये (कोल्ड्रिंक्स) टाळा.
* उच्च प्रथिनेयुक्त अन्न टाळा आणि शिळे अन्न खाऊ नका.
* तुम्ही बाहेर काम करत असाल, तर टोपी किंवा छत्री वापरा.
* डोक्यावर, मानेवर, चेहरा आणि हातपायांवर ओलसर कापडही वापरा.
* पार्क केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी सोडू नका.
* अशक्त किंवा आजारी वाटत असल्यास, ताबडतोब डॉक्टरांना भेटा.
* ओआरएस, लस्सी, लिंबू पाणी, ताक, नारळपाणी हे पेये नियमितपणे प्या.
* जनावरांना सावलीत ठेवा आणि त्यांना भरपूर पाणी द्या.
* तुमचे घर थंड ठेवा, पडदे, शटर किंवा सनशेड वापरा.
* पंखे, ओले कपडे वापरा आणि वारंवार थंड पाण्याने आंघोळ करा.