ह्रदयविकाराच्या झटक्याने शिरसोलीच्या तरुणाचा मृत्यू

0

जळगाव (प्रतिनिधी): शहरातील भोईटे नगर परिसरातील रेल्वेच्या मालधक्क्यावर काम करत असताना एका २८ वर्षीय तरुणाचा छातीत दुखू लागल्याने मृत्यू झाला. निलेश सुभाष गायकवाड (वय २८, रा. चिंचपूरा चौक, शिरसोली ता. जळगाव) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. ऐन दिवाळीच्या सणात घडलेल्या या घटनेने गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, रुग्णालय परिसरात कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला.

मिळालेल्या माहितीनुसार, निलेश गायकवाड हा मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. तो जळगावातील भोईटे नगर येथील रेल्वे मालधक्क्यावर हमाल म्हणून काम करीत होता. बुधवारी, २२ ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे कामावर गेल्यानंतर सकाळी साडे बारा वाजेच्या सुमारास त्याच्या छातीत अचानक तीव्र दुखू लागले. प्रकृती गंभीर झाल्याने सहकाऱ्यांनी तत्काळ त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

या घटनेमुळे शिरसोली गावात शोककळा पसरली असून, जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.