हार्ट अटॅक ‘अचानक’ येत नाही, शरीर आधीच देते ‘हे’ ७ संकेत
हृदयाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष नको; वेळीच सावध झाल्यास टाळता येईल गंभीर धोका
नवी दिल्ली/वृत्तसंस्था: हार्ट अटॅक आला की अनेकदा आपण म्हणतो, “हे तर अचानकच झालं.” मात्र, वैद्यकीय शास्त्र आणि अनुभवी डॉक्टर या मताशी सहमत नाहीत. त्यांच्या मते, हार्ट अटॅक ही अचानक घडणारी घटना नसून ती शरीरात दीर्घकाळापासून होणाऱ्या बदलांचा परिणाम असते. इंटरवेन्शनल कार्डियोलॉजिस्ट आणि इलेक्ट्रोफिजियोलॉजी विशेषज्ञ डॉ. टी.एस. क्लेर यांनी हृदयाच्या आरोग्याबाबत काही महत्त्वाचे धोक्याचे संकेत सांगितले आहेत, ज्याकडे दुर्लक्ष करणे जीवावर बेतू शकते.
हार्ट अटॅकपूर्वी शरीर देतं हे ७ महत्त्वाचे संकेत:
१. छातीत जडत्व किंवा वेदना: छातीत दबाव जाणवणे किंवा जळजळ होणे हे सर्वात सामान्य लक्षण आहे. अनेकदा लोक याला ‘अॅसिडिटी’ समजून दुर्लक्ष करतात, पण ही वेदना वारंवार होत असल्यास ती धोक्याची घंटा असू शकते. २. धाप लागणे: थोडं चालल्यावर किंवा पायऱ्या चढताना श्वास घ्यायला त्रास होणे. हे हृदय पुरेसे ऑक्सिजन पंप करू शकत नसल्याचे लक्षण आहे. ३. अतिशय थकवा जाणवणे: कोणतेही कष्टाचे काम न करताही सतत थकवा येणे, सकाळी उठल्यावर शरीर जड वाटणे. विशेषतः महिलांमध्ये हा बदल प्रामुख्याने दिसतो. ४. वेदना पसरणे: हृदयाशी संबंधित वेदना केवळ छातीपुरती मर्यादित नसतात. त्या डावा हात, मान, जबडा, खांदा आणि पाठीपर्यंत पसरू शकतात. ५. घाम येणे आणि घबराट: विनाकारण अचानक घाम येणे, अस्वस्थ वाटणे किंवा भीती वाटणे हे हार्ट अटॅकचे संकेत आहेत. ६. चक्कर किंवा घेरी येणे: मेंदूला रक्ताचा पुरवठा कमी झाल्यामुळे चक्कर येणे किंवा मळमळणे (उलटी होणे) असा त्रास होतो. ७. झोपेत अस्वस्थता: रात्री अचानक भीती वाटून जाग येणे किंवा झोपताना श्वास कोंडल्यासारखे वाटणे.
बचावासाठी काय करावे?डॉ. क्लेर यांच्या मते, जर १५ मिनिटांपेक्षा जास्त काळ छातीत वेदना होत असतील, तर तातडीने ECG, इको (ECHO) किंवा स्ट्रेस टेस्ट करून घेणे आवश्यक आहे.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी ५ सोपे मंत्र:
नियमित व्यायाम: दररोज किमान ३० मिनिटे वेगाने चाला किंवा हलका व्यायाम करा.आहारावर नियंत्रण: मीठ, तळलेले पदार्थ आणि प्रोसेस्ड फूड (पाकीटबंद अन्न) टाळा.व्यसनांपासून दूर राहा: तंबाखू, धूम्रपान आणि मद्यपान हृदयासाठी अत्यंत घातक आहे. नियमित तपासणी: रक्तदाब (BP), शुगर आणि कोलेस्टेरॉलची वेळोवेळी तपासणी करा.मानसिक आरोग्य: तणाव कमी करण्यासाठी योगासने आणि ध्यान (Meditation) करा.
महत्त्वाची टीप: जर १०-१५ मिनिटांहून जास्त काळ छातीत तीव्र वेदना, श्वास घ्यायला त्रास आणि घाम येत असेल, तर घरगुती उपाय न करता तातडीने जवळच्या रुग्णालयात पोहोचा.