द्वेषाने झपाटलेला समाज

0

 लोकशाही विशेष लेख

 

भावना या मानवाला माणूस म्हणून ओळख बहाल करतात. इतके त्यांचे अस्तित्व महत्वाचे आहे. किंबहुना अनिवार्यच. आपण कल्पना विलासात रमलो कि आपल्यातील बहुतांश लोकांना असेच वाटते कि मानवी जीवन हे प्रेम, आनंद, उत्साह, विश्वास, आशा, कृतज्ञता अश्या सकारात्मक भावनांनी भरलेल असवं. या सकारात्मक भावनांमुळे किंवा तीव्रतेमुळे कदाचित आपण नकारात्मक भावनांचा स्वीकार करण्यास घाबरतो. भीती हि सुद्धा एक भावनाच आहे. परंतु अशी एक भावना आहे जिला सगळेजण घाबरतात ती म्हणजे द्वेष. फारसे न रुचणारे, नावडते, नपटणारे, तिरस्कार प्राप्त ठरणारे आणि अखेर द्वेष हे द्वेशापर्यंत पोहोचतानाचे काही टप्पे.

 

द्वेषाचा जन्म कसा होतो
मानवी समाज हा एका साचेबंध सामाजिक व्यवस्थेमध्ये राहतो. या व्यवस्थेमध्ये त्याचा समाजातील अनेक व्यक्तीसोबत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध येत असतो. मात्र हे संबंध नेहमीच सलोख्याचे आणि मित्रत्वाचे राहतील असेही नाही. परस्परांमधील स्पर्धा, एकमेकांवर वर्चस्व दाखवण्याची वृत्ती, परस्परांवर कुरघोडी करण्याची सवय आणि इतरांपेक्षा पुढे जाण्याची इर्षा हि स्वभाव वैशिष्ट्ये माणसाचे वैयक्तिक आणि अंतर वैयक्तिक संबंध बिघडविण्यास कारणीभूत ठरतात. या सर्व स्वभाव वैशिष्ट्यावर एक प्रबळ भावना नियंत्रण करत असते. ती असते एकमेकांबद्दल असणारा तिरस्कार. ही मुख्य भावना असून या भावनेच्या असूया, इर्षा, द्वेष, घृणा अशा देखील काही भावना पाहायला मिळतात. पण बऱ्याचदा या टप्प्यांची जाणीव न होता त्यांना थारा न देता आपण द्वेष करायला लागतो. परंतु हाच द्वेष जेव्हा एखाद्या अन्याय, अत्याचार किंवा शोषणासंबंधी दर्शवला जातो. मी एखाद्या व्यक्तीचा, धर्माचा, पंथाचा, जातीचा द्वेष करतो हे म्हणणे जसे ऐकायला अवघड व अनुभवायला नकोसे वाटणारे आहे. तसेच अन्याय आणि शोषण करणाऱ्या प्रवृत्ती विषयी मला द्वेष वाटतो याचे समर्थन होऊ शकते. द्वेषाची ही भावना समोरच्या व्यक्तीबद्दल किंवा स्वतःबद्दल देखील असू शकते. हि स्वतःबद्दल, इतरांबद्दल, एखाद्या गोष्टी बद्दल एखाद्या संकल्पनेबद्दल किंवा एखाद्या विशिष्ट वर्तनाबद्दल एक प्रकारची तीव्र, खोलवर रुजलेली घृणा असते. द्वेष हा बऱ्याचदा राग, हिंसा, तिरस्कार, किळस अशा भांवना व वर्तनांशी संबंधित असतो.

गुन्हा करण्यामागच कारण म्हणजे व्देष
द्वेष गुन्हा करण्यामागचं एक मोठं कारण समजलं जात. कारण द्वेषाच्या आहारी जाऊन एखाद्या व्यक्तीने केलेली वक्त्यव्य, घेतलेल्या भूमिका, मांडलेली मत, धरलेले आग्रह हे किती तीव्र व नकारात्मक असतील याचा आपल्याला अंदाज बांधता येईल. अशी व्यक्ती जर तशीच मानसिकता समाजात रुजवू लागली तर समाजात निर्माण होणारी द्वेषाची आढी अधिक मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसेल. हि जबाबदारी निष्ठेने पार पडणारे, समाजात भीती निर्माण करणारे, थोडक्यात म्हणायचं झालं तर हे द्वेषाचे पुरस्कर्ते आपल्या आजूबाजूस बरेच पाहायला मिळतात. सामान्य जनता हि त्याच्या आहारी जाताना आपल्याला दिसते. कधी दबावामुळे, कधी सक्तीने, स्वच्छेनें तर कधी अजाणतेपणाने. द्वेष हि भावना मानवाला स्वस्थ बसू देत नाही. ती मनाचे स्थैर्य हिरावून नेते. द्वेषाची भावना मनाने जपणारी व्यक्ती समोरच्या व्यक्तीच्या चुकांच्या प्रतीक्षेत असते. द्वेषभावनेच्या अमलामुळे कोणावरही विश्वास ठेवणे अशा व्यक्तींना जड जाते आणि त्यामुळे नातेसंबंधांच्या बाबतीत सुद्धा त्यांची पाटी कोरीच असते.

जातींमध्ये मध्ये निर्माण होणारा द्वेष
केवळ आपल्या जातीभाईमुळे आपले कल्याण होईल हि भावना किंवा हा विचार चुकीचा आहे. समाजातील हाच जातीभेद नष्ट झाला पाहिजे. आपल्याकडे जाती धर्माचे राजकारण केले जाते. त्याचमुळे माणूस माणसापासून दुरावत आहे हि दरी मिटवणे आवश्यक आहे. धार्मिक तेड निर्माण करणारी वक्तव्य भारताला नवीन नाहीत. १९९० साली काश्मीरमधल्या काही मशिदींमध्ये हिंदू विरोधी वक्त्यव्य केली जात होती. काश्मीर खोऱ्यातल्या हिंदूबद्दल द्वेष निर्माण करणे हा अशा विधानांचा मुख्य हेतू असायचा. त्यामुळे इथल्या बहुतांश हिंदूंना मुस्लिमबहुल काश्मीर मधून पलायन करावं लागलं होत. त्यानंतर १९९० सालीच भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आयोध्यात राममंदिर व्हावं म्हणून मोठी रथयात्रा काढली होती. याची परिणीती बाबरी मशिदीच्या विध्वंसात झाली आणि नंतर देशात दंगली झाल्या मात्र गेल्या वर्षात अशा प्रकारची धार्मिक तेड वाढवणारी विधान सतत पडत असतात.

राज्यांमध्ये निर्माण होणारा द्वेष
पाहिलं तर राज्यांमध्ये देखील एकमेकांमध्ये कोणत्या न कोणत्या कारणाने द्वेष निर्माण होत आहे. सोशल मीडिया आणि टीव्ही चॅनल्सवरही अशा वक्तव्यांना प्रसिद्धी मिळत असते. अगदी लहानशा राजकारण्याने देखील काही विधान केलं तरी त्या विधानांच्या मोठं मोठ्या हेडलाईन्स बनवल्या जातात. अगोदर अशी विधान निवडणुकीच्या काळात व्हायची. पण आता सोशल मीडियामुळे राजकारण्यांना कळून चुकलं आहे कि एका राज्यांत काही धार्मिक तेड वाढवणारी विधान केली कि दुसऱ्या राज्यांत त्याला मोठं करून लगेचच राजकीय फायदा मिळवता येऊ शकतो.

इर्षा कशी तयार होते
मानव हा इतर प्राण्यांपेक्षा बैद्धिक आणि मानसिक दृष्टया चतुर आणि तितकाच समजून घेण्यास क्लिष्ट असा प्राणी आहे. स्पर्धा करणे हा त्याचा मूळ गुणधर्म आहे. काळाच्या ओघात उत्क्रांत होत असताना विविध सुखासाठी तो नेहमी स्पर्धा करत आलेला आहे. त्याची हि स्पर्धा सर्वप्रथम इतर प्राण्यांसोबत त्यानंतर आपल्या आजू बाजूच्या लोकांसोबत राहिलेली आहे. आपल्या पुढे गेलेल्या माणसांबद्दल आपल्याला इर्षा तयार होत असते. इर्षा म्हणजे तो कसा पुढे गेला, तो कसा यशस्वी झाला. याबाबतची एक भावना आपल्या मनामधून आणि विचारांमधून निघते ती आपल्या मेंदूत घर करते. म्हणजे मन आणि मेंदू यात घोळत राहते त्यामुळे त्या बाबतची भावना आणि विचार कायम तयार होतात त्यामुळे विचार प्रक्रिया वारंवार निर्माण होते. याला विचाराचा कल्लोळ असेही म्हणू शकतो. एखाद्या बद्दल असलेला तिरस्कार जेवढा तीव्र तेवढे तुम्ही आतून तुटत जातात. तिरस्काराने आपल्या जवळचे तर दूर जातातच मात्र दुरचेही आजून दूर जातात.

 

द्वेषाचा आपल्या मनावर कसा परिणाम होतो
द्वेष हा आगीसारखा असतो. तो समोरच्याला सर्व बाजूनी घेरून जाळण्याचा प्रयत्न करतो. मात्र आपण हे विसरून गेलो असतो, कि ती आग आपल्यालाही पोळणार असते. आपल्यात द्वेष वाढला कि आपले अंग थरथरते आणि नकारात्मक भावना सारखी वाढीस लागते. इतरांबद्दल आपण कायम द्वेष करत राहिल्याने आपली विचार प्रक्रिया संथ आणि मंद होते आणि आपण सामाजिक वर्तुळाच्या भाहेर फेकले जातो. एकदा का त्या सामाजिक वर्तुळाच्या बाहेर आपण फेकले गेलो कि बऱ्यापैकी परतीचा मार्ग बंद होतो. साहजिकच याचे विपरीत परिणाम आपल्या दैनंदिन आयुष्यावर होऊन आपण पदोपदी मागे पडत राहतो.

द्वेष टाळण्यासाठीचे उपाय
तिरस्कार किंवा व्देष या भावनांवर नियंत्रण करणे, याचे योग्य व्यवस्थापन करणे यासाठी आपल्याला आधी स्वतः च्या मनाचा शोध घ्यावा लागेल. आपण कोण आहोत? आपले ध्येय काय आहे? ते ध्येय गाठण्यासाठी कोणती उद्दिष्टे विचारार्थ आहेत? आपली क्षमता काय आहे? या बाबींवर सर्वप्रथम लक्ष केंद्रित करायला हवे. आपल्या मनात तिरस्कार आणि यातून निर्माण होणाऱ्या इतर भावना जरी निर्माण झाल्या तरी त्या अत्यंत पुसट आणि तात्काळ विसरणाऱ्या अशा असाव्यात. कारण द्वेषाने द्वेषच मिळतो. द्वेष करणारी व्यक्ती काही काळ आपल्या आत्मविश्वासपूर्ण शब्द, विचार, वर्तनांनी लोकांना भुरळ घालू शकते. परंतु सुज्ञपणे विचार करणाऱ्या व्यक्तीला हे अधिक काळ रुचणार नाही. त्यामुळे आता स्वतःला कोणत्या साच्यात बसवायचे हे आपणच ठरवायचे आहे. नाही का? द्वेषभावना जोपासून स्वतः पासून इतरांपासून दूर जायचे कि सशक्त आणि स्वीकारकाची मानसिकता ठेवण्याच्या प्रयत्नात राहायचं. हे वेळीच ठरवू आणि खरोखरच आपण स्वतःला समाजाचा महत्वाचा घटक म्हणवत असू तर तो घटक सहिष्णू आणि जबाबदार असणं अपेक्षित आहे.

नीतिमत्तेच्या मापदंडानी आणि संविधानिक दृष्ट्या सुद्धा कोणाचाही द्वेष करू नये हे या सर्वावरचे स्वाभाविक आणि सोपे उत्तर नाही का? पण म्हणणं जितकं सोपं आचरणात आणण तितकंच कठीण असत. कोणाचाही द्वेष करू नये हा विचार चांगला आहे. परंतु ते एक ध्येय म्हणून गाठणे मोठ्या धैर्याचे आहे. तरीही द्वेष टाळायचा असेल तर सोडून देणे, विसरून जाणे आणि माफ करणे हे धोरण राबवणे आवश्यक आहे. कमी अपेक्षा ठेवल्या कि यातून तिरस्कार उत्पन्न होत नाही. आपल्या स्वतःला ओळखले कि इतरांशी तुलना आपण करण्याच्या भानगडीत आपण पडत नाहीत. त्यामुळे इतरांविषयी वाटणारी द्वेष हि भावना आपोआप गळून पडते. द्वेष हि भावना आगीसारखी असून हि आग आधी आपल्या मनात पसरते आणि आपल्यालाही भस्मसात करते. त्यामुळे “चला भावनांचे योग्य व्यवस्थापन करूया आणि एक साधे, सोपे, सरळ, समाधानी आणि सुखी आयुष्य जगूया”

“जीवन सुंदर आहे,ते अधिक अनमोल बनवूया”

कोमल बापु पाटील
माध्यमशास्त्र प्रशाळा प्रथम वर्ष विद्यार्थिनी

Leave A Reply

Your email address will not be published.