लोकशाही न्यूज नेटवर्क
काळाची उत्पत्ती सुध्दा ईश्वरा नंतरची आहे. “अक्षरात् संजायते काल:॥” असे एक वचन आहे. वरील रामकृष्णादि देव, एवढेच ईश्वराचे स्वरुप नाही. सृष्टीच्या अगोदर एकच देव होता, त्यानेच सृष्टी उत्पन्न केली व तोच कायम आहे. त्याचे मूळ नाव ॐ असे आहे. वेद, उपनिषदे, भगवद् गीता या सर्व ग्रंथात त्याचेच वर्णन आहे. त्यालाच जाणणे आपला उद्देश आहे. शाश्वत सुख प्राप्तीचा हाच उपाय आहे. व्यासांनी ब्रम्हसूत्रात म्हटले आहे, ” अथातो ब्रम्हजिज्ञासा”॥ब्रसू-१।१।१॥ ब्रम्हाला जाणण्याची जिज्ञासा.. कोणत्याही विषयाला जाणण्याची जिज्ञासा म्हणजे जाणून घेण्याची तीव्र ईच्छा, ईश्वराला, आपल्या स्वस्वरुपाला जाणून घेण्याची ईच्छा ही अध्यात्माची पहिली पायरी आहे. देवी भागवतात सांगीतले आहे कि,
“संख्या चेद् रजसामस्ति। विश्वानां न कदाचन। देवी भागवत॥ “
पृथीवरचे धूलीकण मोजता येणे अशक्य आहे, पण एक वेळ ते मोजता येतील, परंतु आपल्या भोवती, वर, ईतके असंख्य ब्रम्हांड आहेत कि त्यांची संख्या मोजणे अशक्य आहे. अनंत ब्रम्हांड आहेत. या अनंत ब्रम्हांडांचा कर्ता म्हणजे ईश्वर. सामान्य मनुष्य ईश्वर भक्ती करतांना नामस्मरण, भजन, कीर्तन, प्रवचन, श्रवण, ध्यान, दर्शन, पूजा इत्यादि करतो. परंतु, केनोपनिषदात एक गहन व सत्य उपदेश सांगितला आहे. केनोपनिषदात गुरु-शिष्य संवाद आहे. शिष्य गुरुंना विचारतो, “गुरुजी, ब्रम्ह म्हणजे काय?” गुरु सांगतात,
यद्वाचानभ्युदितं येन वागभ्युद्यते।
तदेव ब्रम्ह त्वं विध्दि नेदं यदिदमुपसते॥
केनोपनिषद॥१।४॥
जे वाणीने ऊच्चारता येत नाही, परंतु, ज्याच्या शक्तीने वाचा बोलण्याचे काम करते तो ईश्वर आहे. हे लोक ज्याची उपासना (भजन कीर्तन, प्रवचन) करतात तो देव नाही. कारण, ईश्वर वाणीचा विषय नाही.
“यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह।
आनन्द ब्रम्हणो विद्वान् न बिभेति कदाचन।।”
जेथून मनासह वाणी परत फिरते तो ईश्वर आहे.
“यद्वाचा अनभ्युदितं येन वागभ्युद्यते”।
तेवी तेणे तेजे। वाचेशी वाच्य सुजे।
ते वाचा प्रकाशिजे। हे के आहे॥
अमृतानुभव-५-१५॥
यन्मनसा न मनुते येनाहुर्मनो मतम्।
तदेव ब्रम्ह त्वं विध्दि नेदं यदिदमुपासते॥१-५॥
सामान्य लोक मनाने ईश्वराचे चिंतन, ध्यान करतात. परंतु केनोपनिषदातील गुरु शिष्याला सांगतात. ज्याचे मनाने चिंतन करता येत नाही, जेथ पर्यंत मनच पोहोचू शकत नाही, जे मनाच्या पलिकडचे आहे. परंत, ज्याच्या शक्तीने मन चिंतन इ. कार्य करते तो ईश्वर आहे. हे लोक जे करतात, तो ईश्वर नाही.
यच्चक्षुषा न पश्यति येन चक्षुंषि पश्यति।
तदेव ब्रम्ह त्वं विध्दि नेदं यदिदमुपासते ॥१-६॥
“जे डोळ्यांनी दिसत नाही परंतु ज्याच्या शक्ती मुळे डोळे सर्व काही पाहू शकतात तो देव आहे. हे लोक ज्याच्या कडे पहातात तो देव (ब्रम्ह) नाही. कारण परमेश्वर हा सामान्य इंद्रियांच्या पलिकडे आहे. त्याला पहाण्यासाठी आपल्याकडे अतिंद्रीय दृष्टी किंवा दिव्य दृष्टी पाहिजे.
यच्छ्रोत्रेण न शृणोति येन श्रोत्रमिदं श्रुतम्॥
तदेव ब्रम्ह त्वं विध्दि नेदं यदिदमुपासते ॥१-७॥
जे कानांनी ऐकू येत नाही, परंतु, ज्याच्या शक्तीने कान ऐकू शकतात, ते ब्रम्ह आहे.
यत् प्राणेन न प्राणिति येन प्राण: प्रणीयते।
तदेव ब्रम्ह त्वं विध्दि नेदं यदिदमुपासते॥
केनोपनिषद॥१-८॥
ज्याच्या शक्तीने प्राण, श्वास प्रश्वास कार्य करतात ते ब्रम्ह आहे.
क्रमशः

रिटायर्ड मेडीकल ऑफिसर
नांदगाव, जि. नाशिक
मो. ९८२२४२८५७२