हरिपाठ चिंतन : भाग ४६
जप तप कर्म क्रिया नेम धर्म ।
सर्वांघटीं राम भाव शुध्द ॥१॥
न सोडी हा भावो टाकी रे संदेहो ।
रामकृष्ण टाहो नित्य फोडी ॥२॥
जाति वित्त गोत कुळशीळ (कुलशील) मात ।
भजकां त्वरीत भावना युक्त ॥३॥
ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं ।
वैकुंठभुवनी घर केलें ॥४॥
या अभंगात जप, तप, कर्म, क्रिया, नेमधर्म यांचे फळ सांगीतले आहे. जपतपादि सर्व साधनांचे फळ एकच आहे, सर्वांघटी राम आहे अशी प्रतिती येणे। सर्वा घटी म्हणजे सर्वांच्या शरीरात। सर्वात एकच परमेश्वर आहे ही दृष्टी झाली म्हणजे “परस्पर देवो भव” याचे रहस्य समजते। आपण प्रत्येकात परमेश्वर आहे असे पक्के समजून एकमेकाला वंदन करावे ही सिध्द-संतांची शिकवण आहे.
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म।
भेदाभेद भ्रम अमंगळ॥१॥
ऐकाजी तुम्ही भक्त भागवत।
कराल ते हित सत्य करा॥२॥
कोण्याही जीवाचा (भूताचा) न घडो मत्सर।
वर्म सर्वेश्वर पूजनाचे॥३॥
तुका म्हणे एका देहाचे अवयव।
सुखदु:ख भोग जीव पावे॥४॥
विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म।
भेदाभेद भ्रम अमंगळ॥१॥
आईका जी तुम्ही भक्त भागवत।
कराल ते हित सत्य करा॥२॥
कोणाही जीवाचा न घडो मत्सर।
वर्म सर्वेश्वर पूजनाचे॥३॥
तुका म्हणे एका देहाचे अवयव।
सुख दु:ख जीव भोग पावे॥४॥
(२१) जे जे भेटे भूत।
ते ते मानिजे भगवंत।
हा भक्तियोग निश्चित जाण माझा॥
॥ज्ञानेश्वरी-१०-११८॥
न सोडी हा भावो टाकी रे संदेहो । रामकृष्ण टाहो नित्य फोडी- संशय टाकून शुध्द भावाने रामकृष्णी टाहो फोड। टाहो फोडणे म्ह्णजे अट्टाहासाने नाम घेणे। या नित्य रामकृष्णी टाहो फोडण्यानेच “सर्वाघटी राम” हा भाव उत्पन्न होतो.
जाति वित्त गोत कुळशीळ (कुलशील) मात । भजकां त्वरीत भावयुक्त- भक्ती करण्यात जातीचा अभिमान, कुळ शीळ द्रव्य यांचा अभिमान घातक आहे. परमेश्वराजवळ या अभिमानाला जागा नाही. कोणताही अभिमान न बाळगता ईश्वरभक्ती केली पाहिजे.
ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । वैकुंठभुवनी घर केलें- ज्ञानेश्वर महराज म्हणतात, माझ्या ध्यानी मनी, ध्यानात आणि मनात फक्त रामकृष्णच आहे. त्यामुळे मी विकुंठभुवनी च माझे घर केले आहे. ज्याचे ध्यानी मनी ईश्वराशिवाय काहीच नसते त्याने वैकुंठ भुवन हेच घर केले असे समजावे. “यद्गत्वा न निवर्तन्ते तध्दाम परमं मम॥ भगवद्गीता॥” ज्या ठिकाणी गेले असता मनुष्य पुन्हा दु:खमय संसारात मृत्युलोकात परत येत नाही, पुन्हा कधीही दु:ख बंधनात पडत नाही, तेच माझे परमधाम आहे.
जाणीव नेणीव भगवंतीं नाहीं ।
हरिउच्चारणीं पाही मोक्ष सदां ॥१॥
नारायण हरि उच्चार नामाचा ।
तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥२॥
तेथील प्रमाण नेणवें वेदांसी ।
तें जीवजंतूंसी केंवी कळे ॥३॥
ज्ञानदेवा फळ नारायण पाठ ।
सर्वत्र वैकुंठ केलें असे ॥४॥
भगवंत शब्दाची व्युत्पत्ती-“ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशस: श्रिय:। ज्ञानवैराग्ययोश्चैव षण्णां भग इतीरणा॥ ७४॥ विष्णु पुराण-६-५॥ परिपूर्ण ऐश्वर्य, धर्म, यश, श्री म्ह संपत्ती, ज्ञान व वैराग्य या सहांना “भग” अशी संज्ञा आहे. हे सहाही गुण ज्याचे जवळ परिपूर्णत्वाने वसतात, तो भगवान होय। आईका यश श्री औदार्य। ज्ञान वैराग्य ऐश्वर्य। हे साही गुणवर्य। वसती जेथ॥झानेश्वरी-६-३७॥ ज्ञान आणि वैराग्य पुर्ण। लक्ष्मी आणि औदार्य गुण। ऐश्वर्य आणि यश गहन। हे षट्गुण जाण महाभाग्य॥नाथ भागवत॥१९-४९६॥ परमेश्वरावाचून कोणात ही हे सहा गुण एकत्र राहू शकत नाहीत। आढळून येत नाहीत.
षड्गुणैश्वर्य संपन्न। एक भगवंतचि जाण॥तुका॥ म्हणून त्याला भगवंत म्हणतात. जाणीव नेणीव भगवंतीं नाहीं । हरिउच्चारणीं पाही मोक्ष सदां- नामस्मरण करणारा भक्त जाणता-जाणीव असलेला, ज्ञानी, आहे की नेणीव-अजाणता, अज्ञानी आहे असा विचार भगवान् ईश्वर करीत नाही. नाम जपतो त्याचा ऊध्दार परमेश्वर करतो। याच अर्थाने अमृतानुभव या ग्रंथात सद्गुरुंचे स्वरुप सांगणारी एक ओवी आहे.
“कैवल्य कनकाचिया दाना।
जो न कडसी थोर साना।
द्रष्ट्याचिया दर्शना पाढाउ जो॥२-५॥
मोक्षरुपी सुवर्णाचे दान करतांना सद्गुरु समोरची व्यक्ती लहान आहे की मोठी आहे याचा विचार न करता, असा भेदभाव न करता सर्वांना सारखाच मोक्ष देतात। सर्वांना समान कृपा देतात।“
नारायण हरि उच्चार नामाचा । तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं- याचा विचार आपण यापूर्वी अनेकदा केला आहे. भक्ति किंवा ध्यान करतांना ध्यानाच्या उच्च अवस्थेत आपण अशा जागी जाऊन पोहोचतो कि त्या ठिकाणी मृत्यु ला प्रवेश नाही, काळाचा रीघ नाही, काळ सुध्दा थांबून जातो। अखंड आनंदाचा तो प्रांत आहे.
तेथील प्रमाण नेणवें वेदांसी । तें जीवजंतूंसी केंवी कळे त्या ईश्वराच्या स्वरुपाला वेद सुध्दा पूर्णपणे जाणू शकत नाही, तर सामान्य जीवजंतूंना म्हणजे सामान्य अल्पबुध्दी च्या माणसांना ते काय कळेल? सत्य युगात ध्यान केल्याने, त्रेता युगात यज्ञ केल्याने द्वापार युगात पूजा केल्याने जे फळ प्राप्त होते ते कलियुगात फक्त नामस्मरणानेच प्राप्त होते.
ज्ञानदेवा फळ नारायण पाठ । सर्वत्र वैकुंठ केलें असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आम्हाला हरीनामाचा पाठ हेच फळ (साध्य) आहे. भक्ती ही कर्म, ज्ञान, योगा यापेक्षाही श्रेष्ठ आहे. भक्ती हि स्वयं फलरुप आहे. या नामस्मरणाच्या प्रभावाने हरिभक्तांनी सर्वत्र वैकुंठ केले आहे.
क्रमशः

रिटायर्ड मेडीकल ऑफिसर
नांदगाव, जि. नाशिक
मो. ९८२२४२८५७२

