संतांच्या स्पर्शाने, संगतीने तिर्थांना तीर्थ रुप प्राप्त होते..!

0

 

हरिपाठ चिंतन : भाग ३४

जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात, “कुरुते गंगासागरगमनं व्रतपरिपालन मथवा दानं ज्ञानविहीन सर्वमनेंन मुक्तिर्न भवति जन्मशतेन” संत तुकाराम महाराज म्हणतात, “जाऊनिया तीर्था काय तुवां केलें चर्म प्रक्षाळिलें वरी वरी. ” तीर्थाला जाऊन तू काय केले फक्त वर वर चे शरीराचे चामडे, कातडे, (त्वचा) धुतले. आत तसाच अपवित्र आहे, मन अशुध्द व अनेक वासनांनी लिप्त झालेले, मलिन असे आहे. असे असेल तर कितीही मोठ्या प्रयागादी तिर्थात स्नान केले तरी काही उपयोग नाही. स्वामी दयानंद सरस्वती म्हणतात, गंगेत स्नान केल्याने स्वर्ग मिळाला असता तर गंगेत रहाणारे बेडूक केव्हाच स्वर्गात गेले असते। पण तसे होत नाही.

तीर्थराज प्रयाग अनेक तीर्थ यात्रा केल्यावर मनाला परमेश्वराची आवड लागली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजानी नामस्मरणाचे महत्त्व सांगितले आहे. नाम देव आहे. नाम आणि नामी एकच आहेत. नाम हे देवाचे स्वरूप आहे. अनेक जन्मांची पुण्याई असली तर जिभेवर नामस्मरण येते.

जो हरि नामाविषयी विन्मुख आहे म्हणजे ते नाम कधीही घेत नाही, तो मनुष्य पापी होय. त्याला पापातून सोडविणे साठी हरिवाचून दुसरा कोण धाव घेणारा आहे? भगवंताच्या नामाने तिन्ही लोकांचाचा उध्दार होतो असे वाल्मिकी ऋषी नी सांगीतले आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो हरिनामाचा जप करतो त्याच्या सर्व कुळांचा उध्दार होतो.

फक्त तीर्थात स्नान केल्याने काही प्राप्त होत नाही, त्यासाठी नामस्मरण केले पाहिजे. कितीही वेळा गंगासागर इत्यादि तिर्थांना गेले, कितीही व्रतांचे पालन केले, दानधर्म केले पण जोपर्यंत आत्मज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत शेकडो जन्म जरि गेले तरी मुक्ती नाही. तीर्थयात्रे पेक्षा, तीर्थस्नाना पेक्षा, आत्मज्ञान, नामस्मरण, ईश्वरभक्ती, श्रीगुरुंनी सांगीतलेली साधना एकनिष्ठतेने करणे, संत संग करणे हे श्रेष्ठ आहे. संत हे चालते बोलते तीर्थ आहेत। तीर्थांना तीर्थपण संतांमुळेच येते असे नारद भक्तिसूत्रात आहे. संतांच्या स्पर्शाने संगतीने तिर्थांना तीर्थ रुप प्राप्त होते.

संत एकनाथ महाराज जेव्हा भगवत् कथा करीत असत, तेव्हा रात्री च्या वेळी ३ सुंदर तेजस्वी स्रिया त्यांचे भगवत् कथा निरुपण ऐकण्यासाठी येत असत। एकनाथ महाराजांचा मुलगा हरिपंडीत याच्या मनात संशय आला कि या ३ सुंदर स्रिया कोण आहेत? आपले वडील कथा संपल्यावर त्यांना पोहोचवायला जातात, तो म्हणला आज मी त्यांना पोहोचवायला जातो। एकनाथ महाराज म्हणाले ठीक आहे. हरिपंडीत त्यांना पोहोचवायला गेला, त्याने पाहिले काही अंतर गेल्यावर त्या अदृश्य झाल्या. एकनाथ महाराज म्हणाले या तीन स्रिया कोणी सामान्य स्रिया नाहीत. या साक्षात गंगा, यमुना, सरस्वती नद्या आहेत, त्यांच्या पाण्यात स्नान करुन लोक त्यात स्नान करुन आपली पापे धुवून टाकतात, त्यामुळे त्या अपवित्र होतात, ती मलिनता नष्ट करण्यासाठी त्या भगवत् कथा ऐकायला येथे येतात, व श्रवण करुन पुन्हा पूर्ववत् शुध्द होतात। यावरुन ईश्वरभक्ती ही तीर्थयात्रेपेक्षा श्रेष्ठ आहे याचे हे प्रत्यक्ष उदाहरण। तुकाराम महाराज यांचा एक अभंग आहे, “माय बाप केवळ काशी। तेणे न जावे तीर्थासी॥” जो आईवडिलांची सेवा करतो, त्याला काशीला काशी सारख्या कोणत्याही तीर्थाला जाण्याची गरज नाही. तसेच जो अनन्य ईश्वरभक्ती, गुरुभक्ती करतो त्याला कोणत्याही तीर्थाला, कोठेही जाण्याची गरज नाही.

क्रमशः

डॉ. गोरखनाथ सुकदेव देवरे
रिटायर्ड मेडीकल ऑफिसर
नांदगाव, जि. नाशिक
मो. ९८२२४२८५७२
Leave A Reply

Your email address will not be published.