हरिपाठ चिंतन : भाग ३२

“विष्णुविणे जप व्यर्थ त्याचे ज्ञान।
रामकृष्णी मन नाही ज्याचे॥१॥
उपजोनी करंटा नेणे अद्वय वाटा।
रामकृष्णी पैठा कैसा होय॥२॥
द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान।
त्या कैचे कीर्तन घडे नामी॥३॥
ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान।
नामपाठ मौन प्रपंचाचे॥४॥
शास्रात “विष्णु” शब्दाची व्याख्या आहे, “विष्-वेवेष्टि-सर्वं जगत् स विष्णु:।” जो सर्व विश्वात व्यापून राहिला आहे तो विष्णु। अशा या सर्वव्यापी (विष्णु) ईश्वराशिवाय जो कोणी दुसरा जप करीत असेल त्याचे ज्ञान व्यर्थ होय। भगवद्गीतेत १ श्लोक आहे,
“यान्ति देवव्रता: देवान् पितॄन् यान्ति पितृव्रता:।
भूतानि यान्ति भूतेज्या, यान्ति मद्याजिनोऽपि मां॥ अ-९-२५॥”
जे देवांची उपासना करतात त्यांना देवलोक प्राप्त होतो, जे पितरांची उपासना करतात, त्यांना पितृलोक प्राप्त होतो. जे भूतांची उपासना करतात, (जादूटोणा करणारे) त्यांना शेवटी भूतलोक प्राप्त होतो. आणि जे माझी [म्हणजे निर्गुण निराकार सर्वव्यापी हृदयस्थ ईश्वराची, आत्म्याची, विष्णूची उपासना करतात त्यांना मी प्राप्त होतो. असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतात.
यथा तरो: मूल निषेचनेन,
तृप्यंति तत्स्कंधभुजोपशाखा,
प्राणोऽपहाराच्च यथेंद्रियाणम्,
तथा सर्वाहरणमच्युतेज्या॥
॥भागवत-४-३१-१४॥
ज्याप्रमाणे झाडाच्या मूळाला पाणी दिले तर झाडाच्या सर्व भागांना पाने, फुले, फळे, फांद्या या सर्वांना ते पोहोचते, तसे फक्त एकाच मूळ ईश्वराची [ओम्-विष्णु-आत्मा] उपासना केली तर ती सर्व देव-देवतांना पोहोचते। त्या इतर देव-देवतांची उपासना करण्याची गरज नाही. नाथ भागवत॥
उपजोनी करंटा नेणे अद्वय वाटा।
रामकृष्णी पैठा कैसा होय॥२॥
जो अद्वैत मार्ग जाणत नाही, तो जन्माला येऊनही करंटाच आहे, दैवहीनच आहे. द्वैत-अद्वैत हा विषय अत्यंत गहन आहे. त्याचे सविस्तर विवेचन करणे येथे शक्य नाही. थोडक्यात इतकेच ध्यानात ठेवावे कि, अनेक प्रकारचा भेद म्हणजे द्वैत भाव [जीव-शिव, जीव-ईश्वर इत्यादि] नष्ट करणे व सर्वत्र अद्वैताची प्रतिती येणे हे आपले ध्येय आहे. जोपर्यंत द्वैत आहे, तोपर्यंत भय, दु:ख, बंधने, जन्ममृत्यु चे चक्र आहे. “मृत्यो: स मृत्युमाप्नोति य इह नानेव पश्यति॥” जो भेद पहातो, अनेकता पहातो, तो पुन्हा पुन्हा मृत्यु ला प्राप्त होतो. “द्वितीयाद् वै भयं भवति।” ज्यावेळी जीव च ईश्वर, जीवच ब्रम्ह होतो, तेव्हा काहीच करावे लागत नाही. सर्वत्र आनंदच आहे.
ईश्वराशिवाय, आनंदाखेरीज काहीच नाही. जोपर्यंत अद्वैत भाव येत नाही, तोपर्यंत हा जीव रामकृष्ण स्वरुपाशी समरस होणार नाही. “म्हणैनि माझिया भजना। उचित तोचि अर्जुना। गगन जैसे आलिंगना। गगनाचिया॥ज्ञा-१५-५६४॥ साडे पंधरा मिसळावे। तैं साडे पंधरेचि होआवे। लेवी मी झालिया संभवे। भक्ती माझी॥ज्ञा-१५-५६५॥” जसे आकाशाने आकाशाला आलिंगन द्यावे, तसे देव होऊन देवाची भक्ती करावी। देव होऊन देवाची भक्ती करतो तोच माझी भक्ती योग्य प्रकारे करतो। भक्तीसाठी तोच योग्य आहे.
क्रमशः

रिटायर्ड मेडीकल ऑफिसर
नांदगाव, जि. नाशिक
मो. ९८२२४२८५७२

