सिध्द ग्रंथांचा अभ्यास, सहवास सुध्दा सत्संगच..!

0

हरिपाठ चिंतन : भाग ३०

 

“अध्यात्म शास्री इये। 

अंतरंगचि अधिकारिये॥ज्ञानेश्वरी॥” 

आध्यात्मात तर मन, अंतरंग हेच महत्वाचे आहे. मन हा एक खूप महत्वाचा विषय आहे. मन म्हणजे काय? त्याचे स्वरुप काय? मन चंचल का आहे? मनाला स्थिर करण्याचे, मनाला जिंकण्याचे उपाय काय? यबद्दल चे सविस्तर विवेचन ग्रुपवर योग्य वेळी ठेवण्यात येईल। भागवतात श्रीकृष्णांनी उध्दवाला संतांची व खर्या भक्ताची काही लक्षणे सांगीतली,

 

“निरपेक्षं मुनिं शातं निर्वैरं समदर्शनं। 

अनुव्रजाम्यहं नित्यं पूयेयेत्यंघ्रिरेणुभि:

॥भा-१४-१६॥ ” 

 

संत कसा असतो? निरपेक्ष- कसलीही अपेक्षा नसलेला, मुनि- मननात, चिंतनात मग्न, शान्त-निर्विकार स्थिती, निर्वैर- कोणाही प्राणीमात्रा बद्दल द्वेष नाही, “कोण्याही जीवाचा न घडो मत्सर। वर्म सर्वेश्वर पुजनाचे।“ समदर्शी, असा जो निरपेक्ष संत, भक्त असतो, त्याच्या मागे मागे मी {श्रीकृष्ण} चालतो, त्याच्या पायाच्या धूलिकणाची प्राप्ती करण्यासाठी, अशा संतांच्या पाय धूळीने चरण धूलीच्या एका कणाने माझे १४ भुवने पावन व्हावेत या साठी.

सिध्द ग्रंथांचा अभ्यास, सहवास याला सुध्दा सत्संग म्हणता येईल। संतांच्या संगतीत, राहणे, संतांच्या विचारात रममाण राहणे तसेच सद्गुरुंच्या सत्संग केंद्रात स्वाध्याय, साधना करणे हे सर्व सत्संगच आहेत. संतांच्या संगतीमुळे, विचारांमुळे मन शुध्द होते, ईश्वराकडे वळते, इश्वर भक्तीचे महत्व कळले की मनुष्य आवडीने साधना करु लागतो, व संतानी, सद्गुरुंनी उपदेश केल्याप्रमाणे साधना केल्यास योग्य वेळी खात्रीने ब्रम्हप्राप्ती होते. ग्रंथ वाचनात स्वत:ला श्रम करावे लागतात, तरीही ते समजतीलच असे नाही. त्यापेक्षा ज्यांचा ग्रंथांचा ही अभ्यास आहे व ईश्वरानुभूति आहे अशा संतांकडून ब्रम्हज्ञान समजून घेणे सोपे व खात्रीशीर असते. त्यामुळेच संत संगती ला विशेष महत्व आहे. ब्रम्हज्ञाना बद्दल असे म्हटले आहे की, “ब्रम्हज्ञान ऐकायला मिळने दुर्लभ आहे, ते समजून सांगणारा वक्ता म्हणजे ज्ञाता मिळणे ही दुर्लभ आहे. कारण ब्रम्हज्ञान हे कोणी सांगितल्याशिवाय स्वत: च्या बुध्दीने सहजसहजी कळत नाही. ”

 

“श्रवणायापि बहुभिर्यो न लभ्यः,

शृण्वन्तोऽपि बहवो यं न विद्युः। 

आश्चर्यो वक्ता कुशलोऽस्य 

लब्धाऽऽश्चर्यो ज्ञाता कुशलानुशिष्टः॥कठो-१-२-७॥ 

न नरेणावरेण प्रोक्त एष,

सुविज्ञेयो बहुधा चिन्त्यमानः। 

अनन्यप्रोक्ते गतिरत्र नास्ति, 

अणीयान् ह्यतर्क्यमणुप्रमाणात्॥कठो-१-२-८॥“

 

ब्रम्ह्ज्ञान ऐकायला ही सर्वांना मिळत नाही, ऐकले तरी समजेलच असे नाही. अत्यंत सूक्ष्म असल्याने कोणी दुसर्याने, त्यातील जाणत्याने समजून सांगीतल्याशिवाय समजत नाही. असे कठोपनिषदात सांगीतले आहे.

रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा. आत्मा जो शिवाचा रामजप॥२॥ “रामकृष्ण” असा जप सतत करणे हा जीवांचा अत्यंत शुभ असा भाव आहे. रामजप हा शिवाचा आत्मा आहे, म्हणजे अत्यंत जवळचा, आवडीचा, प्रेमाचा विषय आहे. हरिहर असा भेद करु नये, दोन्ही एकच आहेत, भगवान शिव रामानामाचा नित्य जप करतात, तर श्रीराम शिवाचा जप करतात। भगवान शंकरांनी समुद्र मंथनातून १४ रत्ने निघाली तेव्हा हलाहल विष प्राशन केले, त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला, [नीलकंठ] तेव्हा मस्तकावर शीतल चंद्र धारण केला, सर्प गळ्यात घातले पण दाह थांबेना। तेव्हा शिवांनी रामनामाचा जप सुरु केला, आणि रामजपाने त्यांचा दाह शांत झाला। रामकृष्ण नामाचे असे महत्व आहे.

क्रमशः 

 

डॉ. गोरखनाथ सुकदेव देवरे
रिटायर्ड मेडीकल ऑफिसर
नांदगाव, जि. नाशिक
मो. ९८२२४२८५७२
Leave A Reply

Your email address will not be published.