लोकशाही न्यूज नेटवर्क
वेदा: ब्रम्हात्मविषयास्रिकाण्डविषया इमे।
परोक्षवादा: ऋषया:, परोक्षं च मम प्रिय ॥२१-३५॥
“परोक्षवादा: ऋषया: परोक्षं च मम प्रिय:।” असे भागवतात भगवान श्रीकृष्ण स्वत: म्हणतात। वेदांमध्ये परोक्षवाद असतो। (दिसणरा अर्थ वेगाला, खरा अर्थ वेगळा।) हा परोक्षवाद मला प्रिय आहे.
परोक्षवादामुळेच ग्रंथ वाचतांना अनेकांना बुध्दीभ्रम झाल्यासारखे वाटते। संत तुलसीदास म्हणतात, “श्रुति-पुराण बहु कहेऊ उपायी। छूट न अधिक अधिक उरझाई॥” ग्रंथातील अनेक मतभिन्नता पाहून वाचणर्याच्या मनाला ज्ञान होण्या ऐवजी भ्रम च उत्पन्न होतो. शास्रांचे अध्ययन करण्यासाठी सुध्दा तीक्ष्ण बुध्दी व गुरुकृपा आवश्यक असते, नाहीतर अर्थ न समजल्याने अनर्थ होतो, व शास्र हे शस्र बनते। त्यामुळे अध्यात्मात काही असो, साधना, तीव्र जिज्ञासा, तळमळ व ईश्वर कृपा याशिवाय काहीच प्राप्त होत नाही. ” शास्र है बिल्कुल सच्चा। हम समझने मे कच्चा।” असे मुक्तानांद बाबांचे एक वचन आहे.
हरिपाठ अभंग-१
“देवाचिये द्वारी ऊभा क्षणभरी।
तेणे मुक्ती चारी साधियेल्या॥१॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा
पुण्याची गणना कोण करी॥२॥
असोनी संसारी जिव्हे वेग करी।
वेदशास्र उभारी बाह्या सदा॥३॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा।
द्वारकेचा राणा पांडवा घरी॥४॥
अभंगाच्या पहिल्या चरणाचा सरळ अर्थ- जो देवाच्या दारात क्षणभर, थोडा वेळ, ऊभा राहातो, त्याला ४ ही मुक्ती प्राप्त होतात। परंतु, प्रत्यक्षात आपण पहातो की, देवाच्या मंदिरात, देवळापुढे अनेक माणसे तासन् तास ऊभे रहातात, पण त्यांना काहीच होत नाही. ४ मुक्ती ही मिळत नाही व देवाचा काही अनुभव ही येत नाही. वरील अभंग खोटा म्हणावा तर हा अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. ते खोटे बोलतील का? कारण संतांच्या बाबतीत असे म्हटले आहे की,
उदयति यदि भानु: पश्चिमे दिग्विभागे।
विकसति यदि पद्मं पर्वताग्रे शीलायां।
विचलति यदि मेरु: शीततां याति वन्हि:।
न चलति खलु वाक्यं सज्जनानां कदाचन्॥१॥
उदयति यदि भानु पश्चिमे दिग्विभागे।
ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग ही खोटा म्हणता येणार नाही, व आपला अनुभव सुध्दा खोटा नाही. पण या २ गोष्टी एकमेकांच्या विरुध्द आहेत। मग याचा समन्वय कसा साधायचा? यात खरे काय? हाच वेदातील परोक्षवाद, दिसणारा सरळ अर्थ वेगळा व खरा गूढ अर्थ वेगळा। यावर खूप चिंतन होणे आवश्यक आहे.
कोणत्याही गोष्टीची पूर्ण खात्री झाल्याशिवाय ते मत स्विकारु नये, खरे मानू नये। फक्त ग्रंथात लिहिले आहे म्हणून ते खरे मानावे असे ही नाही. प्रत्येक गोष्टीचा सद्सद्विवेक बुध्दीने विचार केला पाहिजे. त्याबद्दल आपली पूर्ण खात्री सुध्दा पटली पाहिजे. देवांचे गुरु बृहस्पती म्हणतात,
“केवलं शास्रमाश्रित्य न कर्तव्यो विनिर्णय:।
युक्तिहीनविचारे तु धर्महानि: प्रजायते॥१॥
केवळ शास्रात लिहिले आहे एवढ्यावरच निर्णय घेऊ नये। त्यावर योग्य विचार न केल्यास, धर्माची हानीच होते. त्याचा योग्य विचार करुन, खात्री करुन प्रत्यक्ष अनुभव घेऊनच स्वीकारावे. “गुरु करतांना सुध्दा गुरुंची नीट पारख करुनच स्वीकारले पाहिजे. जसा गुरुंना शिष्याची पारख करण्याचा अधिकार आहे, तसा शिष्याला सुध्दा गुरूंची पारख करुन स्विकारण्याचा अधिकार आहे. नुसती अंधश्रध्दा म्हणजे अध्यात्म नाही. अध्यात्म प्रत्यक्ष अनुभवावे शास्र आहे. हे तो प्रचितीचे शास्र। “पानी पीना छान के, गुरु करना पहचान के।” असे हि १ संत वचन आहे.
क्रमशः

रिटायर्ड मेडीकल ऑफिसर
नांदगाव, जि. नाशिक
मो. ९८२२४२८५७२