नास्तिकाची पापे वज्रलेपा सारखी : ती कधीच नष्ट होत नाहीत

0

हरिपाठ चिंतन : भाग २८

 

“पर्वताप्रमाणे पातक करणे।

वज्रलेप होणे अभक्तांसी॥१॥ 

नाही ज्यासी भक्ति ते पतित अभक्त। 

हरीसी न भजत दैवहत॥२॥ 

अनंत वाचाळ बरळती बरळ। त्यां

 कैंचा दयाळ पावे हरी॥३॥ 

ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान। 

सर्वांघटी पूर्ण एक नांदे॥४॥ 

 

जो देवाची भक्ती करीत नाही, तो नास्तिक असल्यामुळे मनाला वाटेल तसे कर्मे करतो, पापे करतो. त्यामुळे त्याची पापे वज्रलेपा सारखे होतात, म्हणजे ते कधीच नष्ट होत नाहीत. अध्यात्मिक वृत्तीचा मनुष्य पाप कर्मांना भीतो, त्यामुळे शक्यतो वाईट कर्मे करीत नाही. नास्तिक अभक्त मनुष्य शास्राप्रमाणे कर्मे न करता शास्रविरुध्द कर्मे स्वैरपणे करतो, त्यामुळे त्याची पापे वाढत जातात. अभक्ताला जो पापे करतो त्याला शासन सुध्दा आहे। ईश्वर कडक न्यायकर्ता आहे. तो पापी लोकांना पापाचे फळ भोगण्यासाठी शासन करतो, रडवतो म्हणून त्याला “रुद्र” (रडवणारा) असे म्हटले आहे. भगवद्गीतेच्या १६ व्या अध्यायात दैवी व आसुरी संपत्तीच्या लोकांचे वर्णन आहे. आसुरी संपत्ति म्हणजे अभक्त असून पापे करणारा.

 

“अनेकचित्तविभ्रान्ता मोहजालसमावृताः। 

प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेऽशुचौ।।१६-१६।। 

तानहं द्विषतः क्रुरान् संसारेषु नराधमान्। 

क्षिपाम्यजस्रमशुभानासुरीष्वेव योनिषु।।१६-१९।।

 

“भगवान श्रीकृष्ण सांगतात, “पापी लोकांना अनेक अशुभ योनीत मी जन्माला घालतो, जेथे गवत ही उगवत नाही अशा ठिकाणी सर्प चिंचु सारखे जन्मात ते स्वत:च स्वत:ला खातात. असे जन्म मी त्यांना देतो. ते पुन: पुन: अधोगतीला जातात व माझी प्राप्ती त्यांना होत नाही.”

जे भक्ती करीत नाहीत, ते पतित अभक्त आहेत, धर्माचा विचार न केल्यामुळे ते पापे करतात, पतित, त्यांचे पतन होते। अशा त्या पतित अभक्ता वर दयाळु परमेश्वर कशी बरे कृपा करील?

दोन वर्ग जर मानले तर (१) अभक्त आहे व पापे करतो। (२)- भक्त आहे, पण त्याच्याकडून नकळत काही पापे घडतात। पूर्वी काही पापे घडली असतील, व आता त्याला पश्चाताप होत असेल तर, तो जर भक्ती करित असेल तर भगवान श्रीकॄष्ण त्याबद्दल म्हणतात,

 

अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक्। 

साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवस्थितो हि सः।।९-३०।। 

क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति।

कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति।।९-३१।

॥भगवद्गीता॥

 

एखाद्याने पूर्वी कितीही पापे केली असली, पण आता त्याला मनापासून कृतकर्मांचा पश्चाताप झाला, व तो हरिभक्ती करीत असेल तर त्याला त्या क्षणापासून साधूच समजावे। तो त्वरीत धर्मात्मा होतो व शाश्वत सुखाला प्राप्त होतो। अर्जुना, माझ्या भक्ताचा कधीही नाश, अध:पतन होत नाही। तुकाराम महाराज सुध्दा एका अभंगात म्हणतात, “मागे झाले पाहू नका। पुढे जामीन आहे तुका॥१।” तुमच्याकडून मागे काही पापे झाली असतील तरी चिंता करु नका, येथून पुढे सत्कर्म करा, ईश्वर भक्ती करा। येथून पुढे मी स्वत: तुम्हाला जामीन आहे, माझ्या शब्दावर विश्वास ठेवा, तुमचे कल्याणच होईल.

क्रमशः 

 

डॉ. गोरखनाथ सुकदेव देवरे
रिटायर्ड मेडीकल ऑफिसर
नांदगाव, जि. नाशिक
मो. ९८२२४२८५७२
Leave A Reply

Your email address will not be published.