अध्यात्म शास्र प्रत्येक मनुष्यासाठी अत्यंत आवश्यक

हरिपाठ चिंतन : भाग १

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

अध्यात्म शास्त्र हे सर्वश्रेष्ठ शास्त्र आहे. अध्यात्म शास्त्र प्रत्येक मनुष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. अध्यात्मशास्राचे महत्व व स्वरुप समजून घेण्यासाठी आपण ज्ञानेश्वर महराजांच्या “हरिपाठ अभंग” या विषयावर अनेक संतग्रंथांचा आधार घेऊन केलेले चिंतन हे अत्यंत फायदेशीर आणि संग्रही ठेवण्यासारखे असेच आहे. दैनिक लोकशाहीच्या माध्यामतून आपण याचे सविस्तर चिंतन करणार आहोत. ‘हरिपाठ चिंतन” यावर सखोल अभ्यास व चिंतन केल्यास हरिपाठात किती गहन अध्यात्मिक ज्ञान आहे, याची आपणास कल्पना येईल..

ॐ नमो जी आद्या । वेद प्रतिपाद्या ।

जय जयाजी स्वसंवेद्या । आत्मरुपा॥

ज्ञानेश्वरी॥१-१॥

 

हरिपाठ चिंतन प्रास्ताविक

अध्यात्म शास्र हे सर्वश्रेष्ठ शास्र आहे। अध्यात्म शास्र प्रत्येक मनुष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे। अध्यात्मशास्राचे महत्व व स्वरुप समजून घेण्यासाठी आपण ज्ञानेश्वर महराजांच्या “हरिपाठ अभंग” या विषयावर अनेक संतग्रंथांचा आधार घेऊन चिंतन करणार आहोत। “हरिपाठ चिंतन”। यावर सखोल अभ्यास व चिंतन केल्यास हरिपाठात किती गहन अध्यात्मिक ज्ञान आहे, याची आपणास कल्पना येईल.

 

विषय- अध्यात्माची आवश्यकता

(१)-कालो न ज्ञायते नाना कार्यै: संसार संभवै:।

सुखदु:खरतो जन्तुर्न वेत्ति हितमात्मना॥२८॥

कुलार्णव तंत्र भगवान शंकर माता पार्वतीला उपदेश करतात, संसाराच्या अनेक कामात आयुष्याचा वेळ केव्हा निघून जातो, हे मनुष्याला कळत नाही। सुखदु:खात रममाण असलेल्या मनुष्याला आपले हित कशात आहे हे कळत नाही॥ [मनुष्य जन्माचा मुख्य उद्देश आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कार, स्वस्वरुपाला ओळखणे हे असून यातच आपले खरे हित आहे, हे न जाणता मनुष्य प्रापंचिक सुखदु:खातच रममाण होतो। त्याचे अमूल्य आयुष्य असेच निघून जाते.]

 

वेदाहमेतं पुरुषं महान्तमादित्यवर्णं तमस: परस्तात्।

तमेव विदित्वाति मृत्युमेति नान्य: पन्था विद्यतेऽनाय॥श्वे-३-८॥

इह चेदवेदीदथ सत्यमस्ति, न चेदिहावेदीन्महती विनष्टिः।

भूतेषु भूतेषु विचित्य धीराः प्रेत्यास्माल्लोकादमृता भवन्ति॥

केनोपनिषद-२-५॥

याच मनुष्य जन्मात परमेश्वराला जाणले तरच आपले कल्याण आहे। जर हा अमूल्य वेळ, संधी निघून गेली तर मोठा विनाश, अनर्थ होईल। कारण पुन्हा मनुष्य जन्म मिळणे दुर्लभ आहे। याच जन्मी घडे देवाचे भजन। आणिक हे ज्ञान नाही कोठे॥१॥
भर्तृहरी वर्णन करतात,

“आयुर्वर्षशतं नृणां परिमितम्, रात्रौ तदर्धं गतं।

तस्यार्धस्य परस्य चार्ध मपरं, बालत्ववृध्दत्वयो:।

शेषं व्याधि वियोग दु:ख सहितं, सेवादिभिर्नीयते।

जीवे वारितरंग बुद्बुदसमे, सौख्य्ं कुत: प्राणिनाम् ॥१॥

मनुष्याला आयुष्य आधीच शंभर वर्षाचे मर्यादित; त्यातले अर्धे रात्रीत जाते। त्या अर्ध्यातले अर्धे बालपण व वार्धक्य, आणि जे उरले सुरले ते सेवा,रोग, वियोगदु:ख या सर्वांमिळून संपून जायचे, जीवन हेच मुळी पाण्याच्या लाटेवरील बुडबुड्यासारखे क्षणभंगुर असल्याने मनुष्याला सुख कोठून मिळणार? (भर्तृहरि वैराग्यशतक॥१३॥)

यावत् स्वस्थमिदं कलेवरगृहं, यावच्च दुरे जरा।

यावच्चेंद्रिय शक्तिरप्रतिहता, यावत् क्षयो नायुष:।

आत्मश्रेयसि तावदेव विदुषा कार्यो प्रयत्नो महान्।

प्रोद्दिप्ते भुवनं च कूपखननं प्रत्युद्यम: कीदृश:?

॥२८॥ भर्तृहरि वैराग्य शतक॥

देह रुपी घर जो पर्यंत स्वस्थ आहे, वार्धक्य जो पर्यंत दूर आहे, इंद्रिये जोवर नीट काम देत आहेत, आयुष्य जोवर संपले नाही, तोवरच सुज्ञ मनुष्या ने स्वत:ला श्रेयस्कर ते प्राप्त करुन घेंण्याचा महान प्रयत्न करावा, घराला आग लागल्या वर विहीर खणण्यास निघणे याला काय म्हणावे?

मनुष्यणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिध्दये।

यततामपि सिध्दानां कश्चिन्मां वेत्ति तत्वत:॥

भगवद् गीता॥ ७-३॥”

“लोके न हि स विद्येत यो न राममनुव्रतम्।।वाल्मिकी रामायण।।”

जगात असा कोणीही मनुष्य नाही, जो रामावर, देवावर प्रेम करीत नाही. प्रत्येक मनुष्य सतत कर्म करतो. कशासाठी, तर सुख प्राप्ती साठी. सुख म्हणजेच परमेश्वर. आनंदो ब्रम्हेति व्यजानात। भृगु संहिता।। म्हणजेच प्रत्येकाचे आतून सुखावर, म्हणजेच ईश्वरावर प्रेम आहे. प्रत्येक जण आस्तिक आहे. ‘श्रध्दामयोऽयं पुरुषः। यो यच्छ्रध्दो स एव सः।‘ गीता।। वेदांताचे प्रयोजन काय हा एक मोठा प्रश्न आहे. सर्वदुखांचा संपूर्ण नाश आणि कधीही नष्ट न होणार्या परमानंदाची पूर्ण प्राप्ति हेच वेदांताचे प्रयोजन आहे. सर्वदु:खनिवृत्ती व परमानंद प्राप्ती हा अध्यात्माचा उद्देश आहे.

दुर्लभं त्रयमेवैतद्देवानुग्रहहेतुकम्।

मनुष्यत्वं मुमुक्षत्वं महापुरुष संश्रय:॥

॥३॥ विवेकचूडामणि

जगात ३ गोष्टी दुर्लभ आहेत, (१)- मनुष्य जन्म (२)- ईश्वर प्राप्तीची ईच्छा, (३)- संतसंगती, सद्गुरुंची भेट होणे। या ३ गोष्टी एकाहून एक श्रेष्ठ व दुर्लभ असून पूर्वजन्माच्या पुण्याईनेच त्या प्राप्त होतात.

जगद्गुरु शंकराचार्य सागतात, मनुष्याने ४ गोष्टींचा विचार केला पाहिजे.

“कोऽहं कथमिदं जातं, को वै कर्ताऽस्य विद्यते।

उपादानं किमस्तीह विचार: सोऽयमिदृश:॥

॥ अपरोक्षानुभूति॥१२॥

मी कोण? हे विश्व कसे उत्पन्न झाले? या विश्वाचा कर्ता कोण? या सृष्टी चे उपादान कारण काय? या ४ गोष्टींचा सतत विचार करणे यालाच व्यासांनी ब्रम्हसूत्रात म्हटले आहे, “अथातो ब्रम्हजिज्ञासा”॥ब्रसू-१।१।१॥ ब्रम्हाला जाणण्याची जिज्ञासा. कोणत्याही विषयाला जाणण्याची जिज्ञासा म्हणजे जाणून घेण्याची तीव्र ईच्छा. ईश्वराला, आपल्या स्वस्वरुपाला जाणून घेण्याची ईच्छा ही अध्यात्माची पहिली पायरी आहे.

क्रमशः 

डॉ. गोरखनाथ सुकदेव देवरे
रिटायर्ड मेडीकल ऑफिसर
नांदगाव, जि. नाशिक
मो. ९८२२४२८५७२
Leave A Reply

Your email address will not be published.