माजी आमदार चैनसुख संचेती
प्रतिनिधी | यावल
समाजाच्या परिवर्तनाचा आधार म्हणजे राजकारण.पदोपदी मनाच्या विपरीत परिस्थिती जात असतांना सुद्धा काम करत राहणे म्हणजे राजकारण.ह्याच दिशेने आणि ध्येयाने स्व.हरिभाऊ काम करत होते.पक्ष निष्ठा काय असते हे भाऊंकडे बघून कळते.सात्विक प्रवृत्ती असलेले हरिभाऊ शेतकऱ्यांचे खरे नेते होते.अनंत अडचणीतही समर्पित भावनेने पक्षाशी एकनिष्ठ राहून जीवन जगणारा नेता म्हणजे स्व.हरिभाऊ.त्यांच्या जीवनीतून अनेकांना प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल अश्या भावना मलकापूर मतदारसंघाचे माजी आमदार चैनसुखभाऊ संचेती यांनी व्यक्त केल्या.
स्व.हरिभाऊ जावळे यांच्या द्वितीय पुण्यतिथीच्या निमित्ताने भालोद येथे त्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम कृषिमित्र स्व.हरिभाऊ जावळे विचार मंचच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता.या प्रसंगी मलकापूरचे माजी आमदार चैनसुख भाऊ संचेती, बेटी बचावचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, माजी जिप अध्यक्ष अशोक कांडेलकर, भाजप जिल्हा अध्यक्ष आ.सुरेश भोळे, अमोल जावळे आणि जिल्हा भरतील भाजप आणि इतर पक्षांचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणतेही महत्वाचे कार्य वैचारीक अधिष्ठान असल्याशिवाय पूर्ण होत नाही.विचारांची बैठक पक्की हवी.स्व.हरिभाऊंमध्ये असलेले सर्व गुण मी अमोल जावळेंमध्ये बघतो आहे.शेतकऱ्यांच्या समस्येवर ते कायम आक्रमकपणे बाजू मांडत असतात.सातत्याने ते सर्वांच्या संपर्कात राहून अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्याचा कुठेही गाजावाजा करत नाही, त्यांनी त्यांचे हे काम यापुढेही अविरत सुरु ठेवून लोकसेवेची मशाल हाती घ्यावी असे प्रतिपादन माजी आमदार चैनसुख भाऊ संचेती यांनी केले आहे.