घरोघरी तिरंग्याचा मान, हीच आमुची शान..

0

भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीत असतांना अमानुष अत्याचार, छळ येथील नागरिकांना सोसावे लागत होते. प्रदीर्घ काळ संघर्ष करतांना अनेकांना प्राणाची आहुती देखील द्यावी लागली. कित्येक क्रांतीकारकांना फासावर लटकवण्यात आले. भारतीय जनता पारतंत्र्यात असतांना “भारत माता की जय” , “वंदे मातरम” यासारख्या जयघोषावर देखील इंग्रजांनी मज्जाव घातला होता. १५ ऑगस्ट १९४७ ची पहाट उजाडली आणि भारतीय जनतेत एक आनंदोत्सव सुरू झाला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्याला आज ७५ वर्ष पूर्ण होत आहे. स्वतंत्र भारतात अनेक उपयोगी योजना, विकासकामे, मतदार, एक व्यक्ती समजून विकास होऊ लागला. सामान्य नागरिक हाच संसदीय लोकशाहीचा मूळ आधारस्तंभ, गाभा आहे म्हणून सामान्य नागरिकांत तिरंगा ध्वज बाबत जनजागृती, प्रसार व्हावा या उद्देशाने तसेच तिरंगा हा राष्ट्रध्वज होण्यासाठी करावा लागणारा संघर्ष तिरंग्यात लपलेला आहे त्याची जाणीव सर्वसामान्यात व्हावी यासाठी “हर घर तिरंगा” अभियान भारत देशात अमृत महोत्सवी निमित्य आयोजित करण्यात आला आहे.

२२ जुलै १९४७ साली भारत देशाचा राष्ट्रध्वज म्हणून “तिरंगा” याला संविधान सभेने मंजुरी दिली आहे. तिरंगा ध्वजात एकूण तीन रंग असून प्रत्येक रंगाचा एक विशेष महत्व अधोरेखित करीत असतो. केशरी रंग त्याग, बलिदान तर सफेद रंग शांतीचे प्रतीक तर हिरवा रंग हा समृद्धीचे प्रतीक आहे. तीन रंगाच्या मध्यभागी सारनाथ येथून घेतलेले अशोकचक्र देखील आहे. त्यात २४ आरे असून गतीचे, विकासाचे प्रतीक आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक देशाचा राष्ट्रध्वज ही शान असते त्याच प्रमाणे भारतीय जनतेचा तिरंगा हा राष्ट्रध्वज ही शान आहे. आज भारतीय देशातील जनतेला ७५ वर्ष पूर्ण होत आहे म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “घरोघरी तिरंग्याचा मान, हीच आमुची शान” म्हणून अमृत महोत्सवी कार्यक्रमाचे औचित्य साधून “हर घर तिरंगा” अभियान संपूर्ण भारत देशात संपन्न होत आहे. २२ जुलै ला मान्यता मिळाली असल्याने त्याच दिवसांपासून या मोहिमेला शुभारंभ केलेला आहे.

ऑगस्ट महिना हा क्रांतीचा महिना म्हणून ओळखला जातो. स्वातंत्र्याचा ज्वाळा याच महिन्यात फडकू लागल्या होत्या त्यामुळे १३ ते १५ आगस्ट पर्यंत प्रत्येकाच्या घरी तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. सामान्य नागरिकांमध्ये देशभक्ती, राष्ट्रभक्तीची पाळेमुळे खोलवर रुजली जावी. प्रत्येकाच्या तनामनात तिरंगा या राष्ट्रध्वजाविषयी अभिमान वाटावा यासाठी हर घर तिरंगा अभियान सुरू केले आहे हाच त्या मागील मुख्य हेतू व उद्देश आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना तिरंग्याचे महत्व पटावे यासाठी शालेय स्तरावर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी प्रत्येक खाजगी, सार्वजनिक कार्यालये व स्थानिक स्वराज्य संस्था, इतर स्वयंसेवी संस्था इत्यादी ठिकाणी तिरंगा डौलाने फडकत असायचा पण सध्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्याच्या पूर्व संध्येला हर घरोघरी तिरंगा फडकविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केला आहे.

तिरंगा हा आपल्या देशाची शान आहे. देशाला अबाधित ठेवण्यासाठी सीमेवर लढणाऱ्या जवानांपासून तर शेतकऱ्यांपर्यंत सर्वांना याची माहिती व्हावी तसेच देशासाठी लढणाऱ्या सैनिकांला अमर हौतात्म्य प्राप्त झाले तर त्यांना तिरंग्यात गुंडाळले जाते इतके महत्व या ध्वजाचे आहे यासाठी हे अभियान नक्कीच उपयोगी ठरणार आहे. तिरंगा ध्वज संहिता देखील जनतेला कळावी, त्याची लांबी, रुंदी तसेच तिरंगा ध्वज फडकवल्यानंतर उतरविण्यासाठी देखील अपमान होऊ नये यासाठी २००२ साली तिरंगा ध्वज आचारसंहिताची अंमलबजावणी व्हावी हा ही मुद्दा प्रकर्षाने सांगावे वाटते. देशात जात, पात, धर्म, वंश, प्रदेश, पोशाख यांचा कोणताही भेदाभेद न पाळता सर्वांनी गुण्यागोविंदाने एकत्र राहण्याची शिकवण राष्ट्रध्वज देत असतो त्यामुळे प्रत्येक नागरिकांच्या मनात राष्ट्र प्रथम याचे बीज पेरण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ हे अभियान फायदेशीर ठरणार आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून तर आजतागायत देशाची प्रगती उंचावत असल्याचे द्योतक तिरंग्यातून जगाला दिसेल. भारताची प्रतिमा जगात उंचावून जाण्यासाठी राष्ट्रध्वज हा अमुचा स्वाभिमान आहे हे प्रत्यक्षदर्शी दिसून येईल म्हणूनच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “घरोघरी तिरंग्याचा मान, हीच देशाची शान” म्हणून ‘हर घर तिरंगा अभियान’ सुरू केले असून त्याला भारतीय जनतेने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन देशाची ७५ वर्षाची गौरवशाली गाथा या तिरंग्यातून दिसेल हे मात्र नक्की..

 

शब्दांकन:- दुशांत बाबुराव निमकर

       गोंडपीपरी जिल्हा चंद्रपूर

       मो.न : ९७६५५४८९४९

Leave A Reply

Your email address will not be published.