न्यायालयाच्या आवारात दोन गट आमने-सामने
पोलिसांचा कडक बंदोबस्त
जळगाव : शहरात लहान मुलांना पळवून नेण्याच्या संशयावरून तलवार हातात घेऊन धार्मिक स्थळी तोडफोड करणाऱ्या प्रवीण रमेश कोळी (रा. पिंजारीवाडा, वाल्मिक नगर) याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाच्या आवारात दोन्ही गट आमने-सामने आल्याने तणाव निर्माण झाला. मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी झाल्याने पोलिसांना बंदोबस्त वाढवावा लागला.
वाल्मिक नगर परिसरात प्रवीण कोळी याला काही जण लहान मुलांना पळवून नेत असल्याचा संशय आला. त्यामुळे तो हातात तलवार घेऊन संशयितांचा शोध घेऊ लागला. त्याचा संशय परिसरातील एका धार्मिक स्थळी गेल्याने तेथे जाऊन त्याने जोरजोरात शिवीगाळ केली. नागरिकांनी त्याला हटकले असता, संतप्त झालेल्या प्रवीण कोळीने धार्मिक स्थळी असलेला पाण्याचा माठ फोडला तसेच पाण्याची टाकी फोडून नुकसान केले. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात प्रवीण कोळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी संशयिताला न्यायालयात हजर करण्यात आले असता, दोन्ही गटातील समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. जोरदार घोषणाबाजी झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. तणावाची परिस्थिती ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक अनिल भवारी, रंगनाथ धारबळे, गुन्हे शोध पथक आणि क्युआरटी पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जमावाला चिथावणाऱ्या काही संशयितांना ताब्यात घेतले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
तीन दिवसांची पोलीस कोठडी
न्यायालयाने संशयित प्रवीण कोळी याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, त्याची रवानगी जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील कोठडीत करण्यात आली आहे.