जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
तालुक्यातील केकतनिंभोरा येथील दिनकर महाराज बहुउद्देशीय संस्था संचलित ओशन इंटरनॅशनल शाळेत हॅलोविन डे अर्थात ( भुताटकी दिन) अतिशय आनंदी व उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. या उपक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या भुताटकी, काल्पनिक व आकर्षक वेशभूषा परिधान करून कार्यक्रमात रंगत आणली. विद्यार्थ्यांचा उत्साह व सहभाग पाहता संपूर्ण शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
हॅलोविन डेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी नृत्य, अभिनय, फनी सादरीकरणे व लहान-लहान कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मुलांनी साकारलेली भुते, जादूगार, कार्टून पात्रे व कल्पक पोशाख सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. कार्यक्रमादरम्यान खेळीमेळीचे वातावरण असून विद्यार्थ्यांनी निर्भयपणे व आत्मविश्वासाने सहभाग घेतला.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमधील कल्पकता, सर्जनशीलता, आत्मविश्वास तसेच सांघिक सहभाग वाढवणे हा होता. शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले. अशा उपक्रमांमुळे शिक्षणासोबतच मनोरंजन, व्यक्तिमत्त्व विकास व सामाजिक जाणीव वृद्धिंगत होते, असे मत शाळेचा संचालिका लक्ष्मी वायकर यांनी व्यक्त केले.
हॅलोविन डे कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना वेगळा अनुभव मिळाला असून पालक व शिक्षकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. ओशन शाळा नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा नाविन्यपूर्ण व आनंददायी उपक्रमांचे आयोजन करत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. त्याप्रसंगी मुख्याध्यापिका सीमा श्रोत्रिया, उपमुख्याध्यापिका सुचिता सोनवणे यांच्या सह शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य व पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.