हटकल्याच्या रागातून मायलेकींवर शिवीगाळ करीत हल्ला

तांबापुरा परिसरातील घटना; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

0

जळगाव,;– तांबापुरा परिसरात घराजवळ मोठ्याने शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीला हटकल्याचा राग आल्याने अश्विन यशवंत सोनवणे (रा. रामेश्वर कॉलनी) याने एका महिलेला आणि तिच्या मुलीला अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना १५ एप्रिल रोजी रात्री ७:४५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तांबापुरा परिसरात राहणाऱ्या तक्रारदार तरुणीच्या घराजवळ अश्विन सोनवणे हा १५ एप्रिल रोजी रात्री जोरजोराने शिवीगाळ करत होता. यामुळे त्रासलेल्या तरुणीच्या आईने त्याला हटकले. याचा राग आल्याने अश्विनने महिलेला अश्लील शिवीगाळ केली आणि त्यांच्यावर धावून जाऊन चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तिच्या मुलीने आईला वाचवण्याचा प्रयत्न केला असता, अश्विनने तिलाही रस्त्यावर ढकलून दिले.

या घटनेनंतर तरुणीने तात्काळ एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारे अश्विन यशवंत सोनवणे याच्याविरुद्ध मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रामदास कुंभारी करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.