धुलिवंदनाच्या वादावरून २५ जणांच्या टोळक्याचा तरुणावर प्राणघातक हल्ला
परिसरात खळबळ

जळगाव: धुलिवंदना दिवशी झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान शनिवारी प्राणघातक हल्ल्यात झाले. बाहेती महाविद्यालयाजवळ २५ जणांच्या टोळक्याने प्रथम लोंढे (१७, रा. कंजरवाडा) याच्यावर चॉपरसारख्या धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्याच्या पाठीवर आणि मांडीवर गंभीर वार करण्यात आले. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रथम लोंढे हा धुलिवंदनादिवशी मित्रांसोबत रंग खेळत असताना काही तरुणांशी वाद झाला होता. तो वाद मिटल्यासारखा वाटला, पण शनिवारी दुपारी बाहेती महाविद्यालयाजवळून जात असताना २०-२५ जणांच्या टोळक्याने त्याला घेरले आणि बेदम मारहाण केली. धारदार शस्त्रांनी वार करून त्याला रक्तबंबाळ केले.
हल्ल्यातून बचाव करण्यासाठी प्रथम लोंढे महाविद्यालयाशेजारील शाळेच्या आवारात पळत गेला. मात्र हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग केला. रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या तरुणाला पाहून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
हल्ल्यानंतर जखमीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, इतक्या गंभीर प्रकारानंतरही डॉक्टरांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली नाही. अखेर संध्याकाळी सातच्या सुमारास पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. यामुळे जिल्हा रुग्णालयाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे.
या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणतीही तक्रार दाखल झाली नव्हती.


