‘एच ३ एन २’ विषाणूचा धोका, सावधान..! काळजी घ्या..!

0

लोकशाही संपादकीय लेख

कोरोनाच्या पहिल्या दुसऱ्या लाटेनंतर भारतातील जनजीवन पूर्वपदावर आले असता आता एच ३ एन २ (H3N2) या विषाणूचा शिरगाव वाढत आहे. भारतात आतापर्यंत गुजरात, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशात प्रत्येकी एक अशा तीन जणांचा या विषाणूमुळे बळी गेला आहे. महाराष्ट्रात १७५ एच ३ एन २ विषाणूच्या रुग्णांची संख्या नोंदवली गेली आहे. मुख्यतः एच ३ एन २ हा श्वसनाशी निगडित असल्याने वृद्ध लोकांमध्ये याचा धोका जास्त आहे. त्यामुळे वृद्धांना यापासून काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे सर्वांनी प्रतिबंधात्मक उपायांचा नियमितपणे वापर करणे गरजेचे आहे. केंद्र शासनाच्या वतीने सर्व राज्यांना सुचित करण्यात आल्या आहेत. एच ३ एन २ विषाणू पासून सावधानता बाळगण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी. श्वसनाशी संबंधित हा आजार असल्याने श्वसनातून त्याचा प्रसार होतो आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाणे एकतर टाळावे अथवा गेल्यास तोंडाला मास्क लावणे गरजेचे आहे. सध्या महाराष्ट्रात तसेच भारतात खोकल्याची साथ असून सर्दी, पडसे आणि खोकला यामुळे सर्वजण त्रस्त आहेत.

आरोग्याच्या उच्चस्तरीय सेवा उपलब्ध असताना सुद्धा एच ३ एन २ सारखा विषाणूचा घातकपणे पसरतो आहे. आधीच न्यूमोनिया मुळे फुफ्फुसे कमकुवत झाली असल्याने या एच ३ एन २ विषाणूमुळे त्याचा लागलीच परिणाम होतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. आपल्या आरोग्याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते. त्यासाठी थोडासा जरी त्रास जाणवला तरी आपण ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत आणि त्यांच्या सल्ल्यानुसार आपली दिनचर्या करावी. म्हणजे धोका वाढल्यानंतर धावपळ करीत बसण्यापेक्षा त्याआधीच डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही उपयुक्त ठरते. कोरोना काळात जनतेची फार मोठी तारांबळ उडाली. कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे रुग्णांचे फार हाल झाले. स्वतःच्या जवळचे नातेवाईक सुद्धा रुग्णांपासून चार हात दूर राहत होते. अनेकांचा यामुळे मृत्यू झाला. त्यामुळे कुठल्याही विषाणूचा शिरकाव आपल्यापर्यंत होणार नाही यासाठी नियमांची काळजी घेणे आवश्यक आहे. त्याकरिता जनतेने प्रशासनावर जास्त अवलंबून राहण्याऐवजी स्वतःची काळजी स्वतः घेणे आवश्यक आहे.

दोन अडीच वर्षाच्या कोरोना व्हायरस साथीचा जनतेला तसेच प्रशासनाला अनुभव असल्यामुळे आरोग्य यंत्रणा सजग आहे. इतर प्रशासकीय यंत्रणा सक्रिय आहे. त्यामुळे एच ३ एन २ या विषाणूला योग्य पद्धतीने परतवून लावणे आता आपल्याला सहज सोपे आहे. तथापि प्रशासकीय यंत्रणेला सजगता बाळगणे आवश्यक आहे. त्यासाठी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता असणे आवश्यक आहे. जळगाव सारख्या जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या शहरात महानगरपालिकेचा स्वच्छता विभाग सतर्क हवा. सार्वजनिक ठिकाणी विशेषता मार्केट मधील गर्दीच्या ठिकाणी अस्वच्छता असता कामा नये. दररोजची स्वच्छता होणे आवश्यक आहे. अलीकडे जळगाव शहरातील विविध भागात गटारी तुंबल्याच्या बातम्या वाचायला मिळतात. गटारी तुडुंब भरून त्यांचे घाण पाणी रस्त्यावर येते आणि त्याचा धोका आरोग्याला होतो. त्यासाठी गटारींची स्वच्छता नियमित होणे आवश्यक आहे. घाण पाण्यातून डासांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते. ते होऊ नये म्हणून डास नियंत्रण फवारणी करणे गरजेचे आहे. ते केलेच पाहिजे. सुदैवाने महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड (Commissioner Dr. Vidya Gaikwad) या सक्षम अधिकारी आहेत. महापालिकेत कर्मचाऱ्यांची कमतरता असताना सुद्धा त्या कर्मचाऱ्यांकडून योग्य रीतीने काम करून घेत आहेत. त्यासाठी जनतेचे सुद्धा त्यांना सहकार्य करण्याची गरज आहे.

कोरोना व्हायरसच्या नियंत्रणासाठी जनतेने स्वतःला जी शिस्त लावून घेतली होती, ती नियमितपणे पाळून दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग करावा. म्हणजे आरोग्यासाठी हे उपयुक्तच आहे. सतत आपले हात स्वच्छ धुऊन सॅनिटायझरने स्वच्छ करावे. घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावावा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे शक्य असेल तर टाळावे. गर्दीत जायचे असेल तर तोंडाला मास्क लावून जावे. विषाणू नियंत्रणाचे नियम पाळणे गरजेचे आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.