जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

जामनेर शहरातील आनंदनगर परिसरातील एका गोदामावर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून सुमारे दीड लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. या कारवाईनंतर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या साठवणूक व विक्रीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
जळगाव अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी किशोर हिमतराव बाविस्कर यांना मिळालेल्या तक्रारीच्या आधारे आनंदनगर परिसरातील विमलकुमार छगनलाल छाजेड यांच्या गोदामाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान प्रतिबंधित पानमसाला, सुगंधित तंबाखू तसेच केसरयुक्त पानमसाल्याचा साठा आढळून आला.
पंचनाम्यानुसार सुमारे ४०० पाकिटे विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आली होती. संबंधित माल ताब्यात घेण्यात आला असून त्याची किंमत सुमारे दीड लाख रुपये असल्याची माहिती आहे. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या तक्रारीवरून विमलकुमार छगनलाल छाजेड यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘चिरीमिरी’चा कथित प्रयत्न
कारवाईनंतर हे प्रकरण माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध होऊ नये, यासाठी संबंधित व्यावसायिकाच्या कथित पंटरमार्फत काही स्थानिकांना संपर्क साधून आर्थिक स्वरूपाचा व्यवहार करण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. प्रकरण दडपण्यासाठी किंवा बातमी सौम्य स्वरूपात प्रसिद्ध करण्यासाठी ‘चिरीमिरी’ देण्याचा प्रयत्न झाल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. त्यामुळे या कथित प्रकाराची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी होत आहे.
रात्री-अपरात्री गुटख्याच्या गाड्या?
दरम्यान, आनंदनगर परिसरातील काही रहिवाशांनी संबंधित गोदामाबाबत गंभीर तक्रारी केल्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, रात्री उशिरा तसेच पहाटेच्या वेळी प्रतिबंधित गुटख्याचा माल घेऊन येणारी वाहने गोदाम परिसरात ये-जा करत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. या तक्रारींची सत्यता तपासण्यासाठी गोदाम परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, वाहनांची ये-जा, मालाची आवक-जावक तसेच संबंधित व्यक्तींचे संपर्क आणि आर्थिक व्यवहार तपासण्याची मागणी होत आहे.
पुरवठ्याच्या मुळापर्यंत तपास जाणार का?
गोदामातून दीड लाख रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त झाला असला तरी हा माल नेमका कुठून आला, त्याचा पुरवठादार कोण आहे, जामनेर शहरात त्याचे वितरण कुठे केले जात होते आणि या व्यवसायात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रशासनाने केवळ माल जप्त करून कारवाई थांबवू नये. प्रतिबंधित गुटख्याच्या संपूर्ण पुरवठा साखळीचा तपास करून त्यामागील मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर आता कथित ‘चिरीमिरी’च्या प्रयत्नांची चौकशी होते का, रात्रीच्या वेळी गोदामात माल उतरविल्याच्या तक्रारींची सत्यता समोर येते का आणि प्रतिबंधित गुटख्याच्या पुरवठ्याचे मोठे जाळे उघडकीस येते का, याकडे जामनेर शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.


