गुटखा तस्करी बाबत आरोप प्रत्यारोप कशासाठी?

0

लोकशाही संपादकीय लेख

महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे. कुटख्याच्या सेवनावर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा कायदा केला आहे. तथापि शेजारच्या मध्य प्रदेशात गुटखाबंदी नसल्याने मध्य प्रदेशातून कोट्यावधी रुपयाची महाराष्ट्रात तस्करी होते. मुक्ताईनगर तालुका मध्यप्रदेशच्या सीमेवर असल्याने महाराष्ट्रातील पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने हा गुटका महाराष्ट्रात येतो, असा आरोप माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून केला आहे. प्रत्यक्ष गुटख्याचा साठा मध्यप्रदेश महाराष्ट्राच्या सीमेवरून मुक्ताईनगर तालुक्यात आला असता रंगेहात पकडूनही दिला गेला. परंतु त्यावर थातूरमातूर कारवाई होते. प्रत्यक्षात असलेला साठा आणि पंचनाम्यामध्ये केलेला साठ्याचा उल्लेख यात तफावत आढळते, आणि गुन्हा दाखल करून आरोपीला सोडून दिले जाते, असा आरोप एकनाथ खडसे यांचा आहे. चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत या संदर्भात आवाज उठवला, सरकारला धारेवर धरले आणि एका राजकीय बड्या नेत्याच्या आशीर्वादाने हे सर्व काही पद्धतशीरपणे चालू असून कोट्यावधीदीचे हप्ते विविध विभागाला दिले जात आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशातील गुटखा मुक्ताईनगर तालुक्यातून येतो. त्यामुळे अनेकांचे जीवन उध्वस्त झाले आहे. ज्या उद्देशाने महाराष्ट्रात गुटखाबंदी करण्यात आली त्यालाच मध्य प्रदेशातील या गुटखा तस्करीमुळे हरताळ फासला जात आहे, असा आरोप एकनाथ खडसे यांचा असून ही तस्करी शासनाने त्वरित बंद करावी अशी मागणी विधान परिषदेत एकनाथ खडसे यांनी केली.

गुटक्याची होणारी तस्करी थांबवली पाहिजे ही खडसेंची तळमळ समजू शकतो. तस्करीचे कोणतेही समर्थन करणार नाही, उलट तस्करीला रोख लावण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रशासनाने एक वेगळी मोहीम हाती घेतली पाहिजे. तथापि तसेच होताना दिसत नाही. उलट एकनाथ खडसे यांनाच या प्रकरणी त्यांचे राजकीय विरोधक दोष देऊन खडसे चुकीचे आरोप करत आहेत, असा पलटवार केला जातो. तस्करीच्या संदर्भात आरोप प्रत्यारोप होत असल्यामुळे पोलीस प्रशासन अथवा संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांचे मनोबल वाढते. राजकीय नेत्यांच्या भांडणात अधिकारी मात्र नाम निराळे राहतात, अशा प्रकारच्या जिल्ह्यातच नव्हे तर अख्या महाराष्ट्रात याचा अनुभव येतो. तथापि जळगाव जिल्ह्यात मात्र याबाबतीत कहरच होतोय असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

जळगाव जिल्ह्यात एकनाथराव खडसे आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचे राजकीय वैमनस्य सर्वश्रुत आहे. त्यांच्यातील विळ्या भोपळ्याचे राजकीय नाते सर्वांना माहित आहे. एकनाथ खडसे आरे म्हटले की त्याला कारे ने पलटवार ठरलेला असतो. कारण राजकारणात सत्तेवर असलेल्या पक्षाच्या विरोधात विरोधकांकडून आरोप करण्याची प्रथाच पडलेली आहे. अडीच वर्षे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना महाविकास आघाडी सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप तत्कालीन विरोधकांकडून होत होता. महागाईला संदर्भात महाविकास आघाडी कडून हल्ला केला जात होता. शेतकऱ्यांच्या विजेच्या समस्यांकडे सरकारला धारेवर धरले जात होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाविकास आघाडीला धारेवर धरले जात होते. आता आठ महिन्यापासून शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर असताना सुद्धा महागाई, शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न, कापूस कांद्याच्या भावाचा प्रश्न ज्वलंत आणि सर्वसामान्यांना तसेच शेतकऱ्यांना भेडसावत असताना या संदर्भात त्या वेळचे विरोधक असलेले आताचे सत्ताधारी मात्र मूग गिळून गप्प बसलेले आहेत. विरोधकांकडून होणाऱ्या आरोपाची मात्र खिल्ली उडवली जाते. राजकारणाचा सारीपाठ बदलल्यानंतर राजकीय विचारही सोयीनुसार बदलतात. परंतु अशा प्रकरणांमुळे सर्वसामान्य जनता मात्र भरडली जाते. त्यांची मात्र कुणी दखल घेत नाही.

सत्तेचा खेळ फार विचित्र असतो. राजकीय महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असताना पाचोर्‍याचे आमदार किशोर आप्पा पाटील (Kishore Appa Patil) यांचे कडून आताचे ग्रामविकास मंत्री यांच्यावर सतत आरोपाच्या फैरी झडत होत्या. किशोर आप्पा पाटील आणि गिरीश महाजन यांचे राजकीय सख्य नव्हते. परंतु शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यापासून त्या दोघातील राजकीय वैमनस्य संपून गिरीश महाजनांच्या हातात हात घालून ते आता वावरत आहेत. ज्या नाथाभाऊंवर महाविकास आघाडी सरकारच्या काळात किंबहुना त्याआधी सुद्धा एक ब्र शब्द न काढणारे किशोर आप्पा पाटील आता गिरीश महाजन यांच्याकडून नाथाभाऊंवर आरोप केले जात असताना गिरीश महाजन यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून हसतमुख त्यांचे समर्थन करतात. यालाच राजकारण ऐसे म्हणतात. मागील विधानसभा निवडणुकीत किशोर आप्पांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार अमोल शिंदे (Amol Shinde) यांनी जेरीस आणले होते, त्या अमोल शिंदेंना किशोर पाटलांच्या या भूमिकेबद्दल काय वाटत असेल, यावर आगामी विधानसभेमध्ये चित्र कसे राहील, या प्रश्नाचे उत्तर काळच देईल…!

Leave A Reply

Your email address will not be published.