लोकशाही विशेष लेख
एकेकाळी दुर्मिळ म्हटला जाणारा कर्करोग आज भारतात झपाट्याने वाढतो आहे. भारतात कर्करोगाने ग्रस्त रुग्णांपैकी ३० टक्केहून अधिक रुग्ण हे मुखाच्या कर्करोगाने ग्रस्त असतात. देशात जलदगतीने वाढत जाणारा मुखाचा कर्करोग रोखणे वैद्यकशास्त्रासमोरील आज मोठे आव्हान बनले आहे. गुटखा, तंबाखू यांचे नियमित सेवन हे या रोगाचे प्रमुख कारण आहे. देशातील झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन देशातील २६ राज्यांनी आणि पाच केंद्रशासित प्रदेशांनी गुटखाबंदी लागू केली आहे. असे असताना गुटखाबंदी करणाऱ्या सर्वच राज्यांत आज गुटखा सहज उपलब्ध होतो आहे. यावरूनच आपल्या देशात भ्रष्टाचार किती खोल रुजला आहे हे लक्षात येईल.
महाराष्ट्रात २०१२ साली गुटखाबंदी लागू करण्यात आली. आजमितीला ही गुटखाबंदी केवळ कागदावरच असल्याचे चित्र दिसत आहे. शहरी भागात पानाच्या लहान मोठ्या टपऱ्यांवर, किराणा मालाच्या छोट्या दुकानांमध्ये आज सर्रासपणे गुटखा विकला जात आहे. शाळा महाविद्यालय परिसरातील टपऱ्यांवरही गुटखा सहज उपलब्ध होत असल्याने शाळकरी मुले आणि महाविद्यालयीन तरुण गुटख्याच्या आहारी जाऊ लागली आहेत. फरक एवढाच असतो कि अशा ठिकाणी गुटख्याची पाकिटे या टपऱ्यांवर दर्शनी भागात मांडली जात नाहीत; मात्र मागणी केल्यावर हवी तितकी पाकिटे उपलब्ध करून दिली जातात.
कोरोनाकाळात जिथे जीवनावश्यक वस्तू मिळणे मुश्किल होते अशा भागांत गुटख्याची पाकिटे चढ्या दराने विकली जात होती. अनेक ठिकाणी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने पान टपऱ्यांवर दर्शनी भागात चिप्सच्या पाकिटांप्रमाणे विविध कंपन्यांची गुटख्याची पाकिटे लटकवलेली दिसून येतात. गावांमध्ये रेल्वेच्या पॅसेंजर गाड्या थांबतात तेव्हा जवळच्या परिसरातील तरुण गुटखा, सिगारेट आणि तंबाखूची पाकिटे विकण्यासाठी गाडीत बिनधास्तपणे फिरतात. प्रवासीसुद्धा यांच्याकडून मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. अन्न व औषध प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट पोलीस यंत्रणा यांमुळे राज्यभर गुटखा पुरवण्याचे छुपे जाळे निर्माण झाले आहे.
दरवर्षी विविध ठिकाणी धाडी टाकुन कोट्यवधीचा गुटखा जप्त केला जातो; मात्र ही कारवाई केवळ दाखवण्यापुरती असते असे अनेक सुजाण नागरिकांचे मत आहे. आजमितीला विविध वाहिन्यांवर, युट्युबवर गुटख्याच्या जाहिराती प्रसारित केल्या जातात ज्यामध्ये उल्लेख पान मसाल्याचा केला जात असला तरी या जाहिराती गुटख्याच्या असतात हे सर्वांनाच ज्ञात आहे. नामवंत कलाकार मंडळी, खेळाडू या जाहिरातींच्या माध्यमातून नागरिकांना गुटखा खाण्याचे आवाहन करताना दिसतात. एकेकाळी गुटखा हा झोपडपट्यांतून, मध्यमवर्गीयांच्या वस्तींमध्ये मोठ्या प्रमाणात विकला जात असे; मात्र अशा जाहिरातीमुळे आज गुटख्यालाही ‘रॉयल स्टेटस’ प्राप्त झाले आहे.
सुशिक्षित आणि श्रीमंतांमध्येही गुटखा खाल्ला जाऊ लागला आहे. एका बाजूने राज्यात गुटखाबंदी करण्यात आली आहे, त्यासाठी शिक्षेचे आणि दंडाचे प्रावधानही करण्यात आले आहे आणि दुसऱ्या बाजूने तरुणांचे रोल मॉडेल असणाऱ्या सिनेकलाकारांना आणि खेळाडूंना घेऊन विविध कंपन्यांच्या गुटख्याची जाहिरातबाजी चालू आहे. गावागावांतून गुटखा पुरवला जात आहे, टपऱ्यांवर सहज उपलब्ध करून दिला जात आहे. हा विरोधाभास नेमके काय दर्शवतो ? गुटख्याच्या निर्मिती आणि वितरणाबाबत कायदा करण्यात आला आहे; मात्र त्याची अंमलबजावणी करण्याची भिस्त ज्यांच्यावर आहे ती पोलीस यंत्रणाच या कायद्याला धाब्यावर बसवणाऱ्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत. आज काही पोलिसांसह राजकीय नेतेमंडळीही सार्वजनिक ठिकाणी गुटखा चघळताना दिसतात, त्यामुळे राज्यात खरेच गुटखाबंदी आहे का ? हा प्रश्न कोणालाही पडल्यावाचून राहत नाही.
जगन घाणेकर
घाटकोपर, मुंबई
मो. ९६६४५५९७८०