शिवसैनिक संतप्त.. धरणगावात महापुरूषांच्या पुतळ्यांचे केले शुद्धीकरण

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांची कॅबिनेट पदी वर्णी लागल्यानंतर शनिवारी त्यांचे जळगाव (Jalgaon) ग्रामीण मतदार संघात आगमन झाले. यावेळी मोठे शर्तीप्रदर्शन करत 60 कि.मी.स्वागतयात्रा काढण्यात आली. या स्वागतयात्रेत त्यांनी महापरुषांना पुष्पहार अपर्ण केले.  तर दुसऱ्या दिवशी रविवारी शिवसेनेने (Shivsena) पुरोहितांच्या हस्ते मंत्रोच्चार करुन शुध्दीकरण केले.

पाटलांचे महापुरुषांना अभिवादन 

शनिवारी गुलाबराव पाटील यांची अमळनेर तालुक्यातील चोपडी कोंडव्हाय फाटा ते पाळधी अशी स्वागतयात्रा काढण्यात आली होती. या यात्रेत चारशेच्या वर चारचाकींसह शक्तीप्रदर्शन करण्यात आले होते. मंत्री पाटील यांनी मतदार संघात शिवाजी महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व महाराणा प्रताप आदी महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला होता.

विधीवत महापुरुषांच्या पुतळ्यांचे शुध्दीकरण 

त्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले. धरणगावात शिवसैनिकांनी पुरोहिताला बोलवून विधीवत मंत्रोच्चार करुन महापुरुषांच्या पुतळ्यांचे शुध्दीकरण केले. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी महापुरुषांच्या स्मारकांना दुग्धाभिषेक केला. यावेळी शिंदे गटाविरुद्ध शिवसेनेकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

स्वागतासाठी पाचशे रुपये रोजाने लोक आणले 

कोरोनाकाळात जगाने, सर्वोच्च न्यायालयाने उध्दव ठाकरेंचा गौरव केला. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. अशा दगाबाज लोकांना महापुरुषांच्या स्मारकाला वंदन करण्याचा नैतिक अधिकार नाही. एवढी शक्ती दाखवताहेत, जनतेने तुम्हाला शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडून दिले. शिवसेना प्रमुखांच्या विचारांवर निवडून दिले. त्या जनतेच्या पायाशी आमदारकी सोडायला हवी होती. परत जनतेत जायला हवे होते. निवडून आले तर शक्तीप्रदर्शन करायला हवे होते. स्वागत यात्रेसाठी पाचशे रुपये रोजाने लोक आणले होते. पहिले मंत्री होते. आताही मंत्री झाले. फरक काय पडला. निवडणुकीत निवडून आल्यानंतरचा जोश उत्साह आता नव्हता,असा आरोप सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी केला. एक महिला त्यांच्या स्वागतयात्रेत नव्हती. स्वाभिमान विकून सत्ता स्थापन करायचा आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याचा त्यांना नैतिक अधिकार नसल्याची संतप्त भावना यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here