गुलाबराव देवकरांच्या अडचणीत वाढ..!

0

लोकशाही संपादकीय लेख 

माजी मंत्री, जिल्हा सहकारी बँकेचे माजी चेअरमन, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी  जिल्हाध्यक्ष आणि जळगाव जिल्हा मजूर सहकारी फेडरेशनचे सर्वेसर्वा गुलाबराव देवकर यांनी जळगाव ग्रामीण मतदार संघातून महाराष्ट्र विधानसभेची 2024 मध्ये निवडणूक लढवली. त्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला चांगलाच हादरा बसला होता. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीतही महायुतीला फटका बसणार, असे चित्र शेवटच्या क्षणापर्यंत होते. जळगाव जिल्ह्यातही महाविकास आघाडीची स्थिती मजबूत असल्याचे चित्र दिसत होते. मंत्री गिरीश महाजन यांचेही धाबे दणाणले होते. त्यांचे विरोधात उभे असलेले त्यांचेच सहकारी दिलीप खोडपे यांनी त्यांच्या नाकात दम आणला होता. परंतु सायंकाळी सहानंतर झालेले प्रचंड मतदानाने जवळपास सर्वांनाच तारल्याची स्थिती जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात सुद्धा दिसून आली. अन्यथा गुलाबराव देवकरांचे पारडे चांगलेच जड होते. मतदार संघात ठिकठिकाणी मतदारांकडून जोरदार स्वागत होत होते.

मतदारांनी एकत्र येऊन ठिकठिकाणी गुलाबराव देवकरांना आर्थिक मदतही दिली. वाढीव आमदार आणि सहानंतर झालेल्या मतदानाने सर्वत्र वारे फिरले. जळगाव जिल्ह्यात एकाही महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला नाही. महायुतीच्या सर्वच्या सर्व ११ उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने बाजी मारली. गुलाबराव देवकरही पराभूत झाले. गुलाबराव देवकर पराभूत झाल्यानंतर नैराश्याच्या भावनेतून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला रामराम ठोकून अजित पवार गटात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. अजित पवारांनी गुलाबराव देवकर यांचे संबंध अत्यंत चांगले असताना अजित पवारांच्या उपस्थितीत मुंबईला देवकरांचा पक्ष प्रवेश होणार, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. परंतु अजित पवार पक्षाच्या जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांचा त्यांच्या पक्षप्रवेशाला विरोध असल्याच्याही बातम्या प्रसिद्ध झाल्या.

अर्थात गुलाबराव देवकर अजित पवारांच्या पक्षात आले तर स्थानिक अजित पवार निष्ठावंत नेत्यांचे वर्चस्व कमी होईल, अशी भीती असल्यामुळे देवकर यांच्या प्रवेश प्रवेशाचा विरोध वाढत गेला. त्यामुळे त्यांचा पक्ष प्रवेश रखडला तो अद्याप झालेला नाही. त्यात महायुती सरकारमध्ये सत्तेतील एक घटक अजित पवार असले तरी, महायुती सत्तेवर आल्यापासून छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने निर्माण झालेला पेच, मंत्रिमंडळाची शपथ दिल्यापासून बीड जिल्ह्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे संदर्भात निर्माण झालेला वाद, सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची होणारी मागणी तसेच धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा द्यावा लागलेला राजीनामा, राष्ट्रवादीचे आमदार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना झालेली दोन वर्षाच्या शिक्षेचे प्रकरण या सर्व बाबींमुळे अजित पवार यांचा पक्ष अडचणीत आला आहे. त्यामुळे गुलाबराव देवकरांच्या पक्षप्रवेशाचा निर्णय थंडबस्त्यात पडला असून गुलाबराव देवकरांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

गुलाबराव देवकर अजित पवारांच्या पक्षात जाण्याचे एकमेव कारण म्हणजे त्यांच्या काही आर्थिक बाबींना सत्तेचे संरक्षण मिळणे ही अपेक्षा आहे. कारण जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना दहा कोटी रुपयांचे कर्ज घेतले आणि त्याची अद्याप परतफेड केली गेलेली नाही. निवडणुकीसाठी गुलाबराव देवकरांनी हे कर्ज घेतले, ते बेकायदेशीर आहे. त्याबाबतीची तक्रार बँकेचे एक संचालक सुरेश पाटील यांनी केली असल्याने देवकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या संदर्भात गुलाबराव देवकरांचे प्रतिस्पर्धी विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणतात, “गुलाबराव देवकर महाविकास आघाडीत असले काय किंवा अजित पवारांच्या सत्ताधारी पक्षात गेले काय, देवकरांना मध्ये जावेच लागणार आहे.” असे सूचक वक्तव्य केले. आपल्या एका प्रतिस्पर्धी विरुद्ध आवाज उठवणार एवढे मात्र निश्चित. त्यामुळे पालकमंत्री स्वतः गुलाबराव देवकरांच्या विरुद्ध असल्याने देवकारांच्या अडचणी वाढतील यात शंका नाही.

जिल्हा बँकेचे दहा कोटी कर्जाबाबत तर पालकमंत्र्यांनी आवाज उठवतात त्याचबरोबर जिल्हा मजूर सहकारी फेडरेशन मधील घोटाळ्या संदर्भातही पालकमंत्र्यांनी सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे मजूर फेडरेशन प्रकरणही गुलाबराव देवकरांना भोवणार आहे का? हा प्रश्न उपस्थित होतो आहे. त्यातच गुलाबराव देवकरांच्या होमिओपॅथी महाविद्यालयाला अद्याप परवानगी दिलेली नाही. बिगर परवानगीनेच हे महाविद्यालय चालू आहे. त्यामुळे परवानगी होमिओपॅथी महाविद्यालय चालवणे सोपे नाही. म्हणून होमिओपॅथी महाविद्यालयाचा मार्ग मोकळा व्हावा म्हणून देवकर अजित पवारांच्या पक्षात प्रवेश घेऊ इच्छितात असे त्यांचे स्थानिक विरोधक दावा करतात. त्यामुळे गुलाबराव देवकर यांची राजकीय कारकीर्द सध्या अडचणीत आहे. परिणामी महायुतीच्या सत्तेतील भागीदार पक्ष अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची मनीषा त्यांनी व्यक्त केली आहे, असा आरोपही त्यांच्यावर होतो आहे. परंतु पक्षश्रेष्ठींचे पक्षप्रवेशाचा त्यांचा भिजत पडलेला मार्ग मोकळा होईल का ? हा खरा प्रश्न आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.