लोकशाही संपादकीय लेख
जळगाव जिल्ह्यातील एक सुसंस्कृत अभ्यासू नेते, शरद पवार यांचे खंदे समर्थक, निष्ठावान कार्यकर्ते चोपडा येथील माजी मंत्री, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराथी हे आता राजकारणातून निवृत्त होणार असल्याचे जाहीर केले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत नुकतीच जळगाव येथे जिल्ह्याची बैठक झाली. त्या बैठकीला अरुण भाई अनुपस्थित होते. त्यामुळे अरुण भाई शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सोडून ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशा अफवा पसरल्या होत्या. कारण चोपडा शहर आणि तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते अजित पवार यांच्या गटात प्रवेश करत आहेत. त्यामुळे त्या कार्यकर्त्यांबरोबर अरुण भाई सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार अशा बातम्या पसरत होत्या. परंतु अरुण भाई गुजराथी यांनी जाहीर केले की, मी शरद पवारांना सोडून कोठेही जाणार नाही ही वस्तुस्थिती आहे, आणि चोपड्यातील माझे कार्यकर्ते अजित पवार गटात प्रवेश केला आहे, त्या कार्यकर्त्यांचेही हित जपण्यासाठी आगामी निवडणुकीत त्यांना सहकार्य करणार, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे.
अरुण भाईंच्या या बुचकळ्यात टाकणाऱ्या वक्तव्यामुळे त्यांच्याविषयी आणखीनच संभ्रम निर्माण केला. परंतु त्यांनी स्पष्ट केले की, मी शरद पवारांना सोडणार नाही पण आता राजकारणातून निवृत्त होणार आहे. तरीसुद्धा माझ्या चोपडा तालुक्यातील जे कार्यकर्ते आहेत जे अजित पवार गटात गेले आहेत, त्यांना वाऱ्यावर न सोडता आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत सहकार्य करणार आहे, असे देखील स्पष्ट केले. त्यामुळे चोपडा तालुक्यात आता राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद चांगली वाढलेली आहे. कारण माजी आमदार चोपडा सहकारी सूतगिरणीचे चेअरमन यांचे नेतृत्व शरद पवार गटातील बहुसंख्य कार्यकर्ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आगामी सर्व निवडणुका माजी आमदार कैलास बापू यांचे नेतृत्वात लढणार असून त्याला अरुण बाई गुजराथी हे सहकार्य करणार आहेत. अरुण भाई गुजराथी यांच्या राजकारणातील गेल्या 30 ते 40 वर्षातील अनुभवाचा फायदा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे, यात तीळ मात्र शंका घेण्याचे कारण नाही. कारण महाराष्ट्र आणि देशातील राजकारणाच्या दलदलीत अरुण भाई गुजराथी हे मात्र नाम निराळे राहिले. एक शालिनी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांना कसलाही भ्रष्टाचाराचा डाग लागला नाही. अनेक खात्यांचे मंत्रीपद त्यांनी उपभोगले. पाच वर्षे सलग विधानसभेचे अध्यक्ष पद त्यांनी यशस्वीरित्या भूषविले, पण त्यांच्यावर कुणीही शिंतोडे उडवू शकलेला नाही.
जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठे प्रस्थ आज निवृत्त होत आहे. वयाची 85 वर्षे त्यांनी पूर्ण केली असली तरी अजून त्यांची प्रवृत्ती ठणठणीत आहे. आजच्या राजकीय जीवनात त्यांनी कधीही गटातटाचे राजकारण केले नाही. शांत स्वभावाचे अरुण भाई यांचा संयमीतपणा वाखाणण्याजोगा होता. त्यांच्या राजकीय जीवनातून त्यांनी जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी ठोस अशी पावले उचलली आहेत. तरी आज राजकारणातून राहून भ्रष्टाचारापासून दूर राहिलेल्या नेता अशी त्यांची ओळख आहे. चोपडा शहर आणि तालुक्यात त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचे एक मोठे जाळे आहे. त्या कार्यकर्त्यांच्या जीवावर त्यांचे राजकारण चालत असे. शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. ते स्वतः म्हणतात की मी एक राजकीय ठिणगी होतो. तथापि शरद पवारांनी मला ज्वाला बनविले. राजकारणात एक अल्पसंख्यांक समाजातील व्यक्ती इतके वर्ष बहुजन समाजाबरोबर राजकारण करतो, हेच त्यांच्या यशाचे गमक आहे. राजकारण कधी त्यांच्या डोक्यात भिनले नाही. स्वतः एक उच्चशिक्षित सीएची पदवी प्राप्त केलेले अरुण भाई गुजराथी हे एक उत्तम वक्ते होते.
सीएची पदवी घेणारे अरुण भाई गुजराथी जेव्हा व्यासपीठावर बोलायला उभे राहिले तर आपल्या भाषणात शेरोशायरीने धमाल उडवून देत. असे हे एक राजकीय व्यक्तिमत्व आज राजकारणातून दूर जाते आहे. याची सर्वांनाच खंत वाटते. आपले सर्व कार्यकर्ते शरद पवारांना सोडून अजित परांकडे गेले. त्यात कार्यकर्त्यांचे राजकीय हित असल्याने ते जात आहेत, परंतु मी मात्र कुठल्या पक्षात जाणार नाही. शरद पवारांवरील माझे निष्ठा कायम आहे. म्हणून मी राजकारणातून निवृत्त होतो आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. राजकारणातील एक अजातशत्रू म्हणून देखील त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. आता चोपडा शहर व तालुक्यातील राजकारणात अमूल्य बदल होईल, यात शंका नाही परंतु सर्व विरोधी पक्षांना सोबत घेऊन चोपडा तालुक्याचे राजकारण करणारा नेता म्हणून त्यांनी निर्माण केलेले स्थान इतर कोणी घेईल असे वाटत नाही. त्यांची राजकारणातील निवृत्ती आणि त्यांच्यावर अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी सहकार्य करण्याची केलेली घोषणा, ही कितपत सत्यात उतरेल हे आगामी निवडणुकीत स्पष्ट होईल. तथापि अरुण भाईंच्या राजकीय कारकीर्दीला आमच्या शुभेच्छा…!