पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’च्या (जीबीएस) रुग्णांवरील उपचारांसाठी तसेच ‘जीबीएस’ प्रतिबंधासाठी महापालिकेने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. सिंहगड रस्ता परिसरातील किरकटवाडी, नांदोशी, नांदेड, धायरी या गावांत अधिक रुग्ण सापडत असल्याने राजाराम पूल ते खडकवासला दरम्यान महापालिका हद्दीतील भागाला ‘जीबीएस’ बाधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. आता शहरातील चार ‘न्यूरोलॉजिस्ट’नी पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात सेवा देण्याची तयारी दर्शवली आहे. एका डॉक्टरने कामही सुरू केले आहे.
बाधित क्षेत्रातील रुग्णांना महापालिकेच्या शहरी गरीब योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यात दोन लाखांपर्यंतची मदत मिळू शकणार आहे. जे नागरिक शहरी गरीब योजनेत पात्र होत नाही, त्यांनाही एक लाखांची मदत पालिकेतर्फे केली जाणार आहे.
महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले व पाणीपुरवठा विभागप्रमुख नंदकिशोर जगताप यांनी खासगी टँकरचालकांची बैठक घेऊन सूचना केल्या. सर्व खासगी टँकरचालकांना २५ किलो ब्लिचिंग पावडर दिली आहे. त्याचा वापर किती प्रमाणात करायचा, याच्या सूचनाही दिल्याचे जगताप यांनी सांगितले.
शहरात ‘जीबीएस’च्या संशयित रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांची माहिती एकत्र करण्यासाठी पालिकेने ‘जीबीएस’ संबंधी आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू केला आहे. या कक्षाशी ०२०-२५५०६८००, ०२०-२५५०१२६९ अथवा ०२०-६७८०१५०० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. नीना बोराडे यांनी केले आहे.
तसेच रुग्णांना महापालिकेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या योजनेचा फायदा घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शहरातील रुग्णालयांसाठी आरोग्य विभागाने नोडल अधिकाऱ्यांची नियुक्त केली आहे. बाधित गावांत ‘मेडिक्लोर’च्या ३० हजार बाटल्यांचे वाटप महापालिकेकडून करण्यास सुरुवात केली आहे.