जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
गिलीयन बॅरे सिंड्रोम (GBS) या आजारावर पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शन बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी गिलीयन बॅरे सिंड्रोमच्या लक्षणांपासून उपचारांपर्यंत सविस्तर माहिती दिली.
आरोग्य विभागाची तयारी: सर्व्हेक्षण, ICU बेड्सपैकी 20% बेड GBS रुग्णांसाठी राखीव ठेवणे, SOP तयार करणे, प्रशिक्षण सत्र आयोजित करणे व संशयित रुग्णांसाठी प्रयोगशाळा चाचणीची तयारी ठेवणे.
स्थानिक प्रशासनाची जबाबदारी: नगरपालिका व ग्रामपंचायतींनी स्वच्छता मोहीम, निर्जंतुकीकरण, शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा, मलनिस्सारण आणि डास नियंत्रण मोहीम राबविणे.
जनजागृती व अफवा रोखणे: जनसंपर्क विभागाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविणे व चुकीच्या माहितीला आळा घालणे.
आपत्ती व्यवस्थापन : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने विभागीय समन्वय ठेवून संसाधन वाटप आणि प्रतिसाद योजना प्रभावीपणे राबवणे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगावचे डॉ. पाराजी बाचेवर व डॉ. अभिजीत पिल्ले यांनी आजाराबाबत शास्त्रशुद्ध माहिती दिली. याशिवाय जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांनीही मार्गदर्शन केले.
सर्व विभागांनी समन्वय साधावा आणि जनजागृतीवर भर द्यावा, पिण्याचे पाणी दूषित असल्यास त्वरित तपासणी व कारवाई करावी, डेंगू व मलेरिया यांसारख्या किटकजन्य आजारांवर त्वरीत उपाययोजना राबवाव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी दिले.
या बैठकीस सर्व तालुका आरोग्य अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी, आरोग्य विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अधिकारी रणवीर रावळ उपस्थित होते.