चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

महामार्ग पोलीस मदत केंद्र चंद्रपूर तर्फे सेंट अँन्स हायस्कूल, वरोरा (जिल्हा चंद्रपूर) येथे शाळकरी मुलांना बस व ऑटो रिक्षा ने सोडणाऱ्या चालकांसाठी एक महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंबंधी अनेक महत्त्वाच्या सूचना आणि मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी बैठकीचे प्रमुख आयोजक माया चाटसे, सहायक पोलीस निरीक्षक, महामार्ग पोलीस मदत केंद्र चंद्रपूर याशिवाय उमाकांत गौरकर (पोलीस उपनिरीक्षक), सौ श्वेता लांडे (शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती वरोरा), नरेंद्र कोसुरकर (सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक), तसेच सेंट अँन्स हायस्कूलच्या प्रमुखांमध्ये सिस्टर डॉली जोश (मुख्याधापिका), सिस्टर सबिना (व्यवस्थापिका), सिस्टर मीन्शि जोसेफ (उप मुख्याध्यापिका) उपस्थित होते. याशिवाय ऑटो रिक्षा व बस चालक संघटना अध्यक्ष रमेश बाबाराव सणस, परिवहन सुरक्षा समितीचे सदस्य आणि १०० ते ११० चालक या बैठकीत सहभागी झाले.
प्रसंगी बैठकीत चालकांना शाळकरी मुलांना सुरक्षितपणे शाळेत सोडताना गाडीची नियमित आरटीओ तपासणी करून फिटनेस सुनिश्चित करावी, वाहनाचा परवाना, विमा आणि इतर आवश्यक कागदपत्रे सदैव सोबत ठेवावीत, अशी महत्त्वाची सूचना देण्यात आली. तसेच, स्वच्छ गणवेश परिधान करून चालकांनी आपला बॅज दिसेल अशा ठिकाणी लावावा, तसेच मद्यपान करून वाहन चालवू नये, याबाबतही कडक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
तसेच शाळेसोबत संपर्क ठेऊन चालकांनी आपले नाव व मोबाईल नंबर शाळेला कळवावे, ड्रायव्हर सुट्टीवर गेले तरी ताबडतोब माहिती देणे आवश्यक असल्याचे सांगितले गेले. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर अधिक चांगली निगराणी ठेवता येईल, अपघात किंवा इतर अपघाती घटना टाळता येतील.
या बैठकीत उपस्थितांचे प्रबोधन करण्यात आले, ज्याचा उद्देश शाळकरी मुलांच्या सुरक्षित प्रवासाची हमी देणे हा होता. उपस्थितांना नियमांचे पालन करून, विद्यार्थ्यांच्या गरजा आणि सुरक्षिततेसंबंधी जबाबदारी अनिवार्यपणे स्वीकारावी, यावर भर देण्यात आला.
माया चाटसे, सहायक पोलीस निरीक्षक, महामार्ग पोलीस मदत केंद्र, चंद्रपूर यांनी माहिती सविनय सादर करत, अशा बैठकींचे लक्ष्य विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची खात्री करणे आणि वाहनचालकांना जबाबदारीची जाणीव करून देणे असल्याचे स्पष्ट केले.


