लोकशाही न्यूज नेटवर्क
नागरी वस्त्यांमध्ये घुसून बिबट्यांचे होणारे हल्ले मागील काही दिवसात वाढले आहेत. अशात शिराळा तालुक्यात चार वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने नातवावर हल्ला केल्याचे पाहून आजोबांनी मोठे धाडस करून बिबट्याशी दोन हात करत बिबट्याच्या तावडीतून नातवाची सुटका केली. दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील गिरजवडे येथे सदरची घटना घडली आहे. गिरजवडे येथील चार वर्षाच्या आरव मुळीक हा आजोबा सोबत शेतात गेलेला होता. यावेळी आरव याच्यावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. हे पाहून जवळच असलेल्या आजोबांनी न घाबरता मोठे धाडस करून बिबट्याच्या तावडीतून आपल्या नातवाला बचावले. तर मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बजरंग मुळीक हे आपला नातू आरव याला सोबत घेऊन गाडे मळा शेजारी असणाऱ्या पाचिरो पाडा येथे जनावरांसाठी गवत आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी सोबत काशिनाथ मुळीक, शोभा मुळीक, राजेश्री मुळीक उपस्थित होते. दरम्यान त्यावेळी अचानक झाडाच्या आड लपलेल्या बिबट्याने आरव याच्यावर झडप घालून त्यास उसाच्या शेतात फरपटत नेले. अचानक घडलेल्या या प्रकाराने सर्वजण घाबरून गेले होते.
त्यावेळी काशिनाथ मुळीक यांनी धावत जाऊन आरवची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली. यात आरव याच्या मानेवर जखम झाली आहे. आजोबा बजरंग मुळीक आणि मोहन मुळीक यांनी त्यानंतर त्यास मोटरसायकलवरून उपचारांसाठी शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती वनविभागाला दिली. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कराड येथे दाखल केले आहे.