कारच्या लकी-ड्रॉची चौकशी करून परतताना काळाचा घाला; आजोबा-नातवाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

0

महिन्याभरापूर्वी खरेदी केलेल्या कारच्या लकी-ड्रॉची माहिती घेऊन परतणाऱ्या आजोबा आणि नातवाचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पाळधीनजीक सावदे–रिंगणगाव फाट्यावर घडली. या अपघातात देशमुख चुनीलाल राठोड (वय 55, रा. निपाणी तांडा, ता. एरंडोल) आणि त्यांचा नातू परेश दिनेश राठोड (वय 6) यांचा जागीच मृत्यू झाला.

निपाणी तांडा येथील देशमुख चुनीलाल राठोड हे आपल्या लहानग्या नातवाला, परेशला घेऊन महिन्याभरापूर्वी खरेदी केलेल्या कारच्या लकी-ड्रॉची माहिती घेण्यासाठी गेले होते. माहिती घेऊन ते दोघे दुचाकीने घरी परतत असताना पाळधीजवळ सावदे–रिंगणगाव फाट्यावर त्यांच्या दुचाकीला (एम.एच. 19 आर 1642) भरधाव कंटेनरने (एम.एच. 05 एम 3248) जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात आजोबा आणि नातवाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. देशमुख राठोड यांनी कुटुंबासाठी आनंदाने नवीन कार खरेदी केली होती. मात्र, अवघ्या महिन्याभरातच काळाने हा आनंद हिरावून घेत आजोबा-नातवाला मृत्युमुखी पाडले.

घटनेची माहिती मिळताच राठोड कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. वडील आणि लहान मुलगा गमावल्याने दिनेश राठोड यांना अश्रू अनावर झाले. दोघांचे मृतदेह पाहताच राठोड कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला चिरणारा होता. परिसरात हळहळ व्यक्त होत असून या घटनेने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.