रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याविषयी करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ आज रावेर येथे समस्त नागरिकांच्या वतीने भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाला रावेर तालुक्यातील सर्व स्तरातील नागरिकांचा उत्स्फूर्त आणि लक्षणीय प्रतिसाद लाभला.
या मूक मोर्चामध्ये केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. तसेच महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून महिलांच्या सन्मानासाठी आपली एकजूट दाखवली.

मोर्चानंतर तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या विजय चौधरी (नंदुरबार) यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांनी महिलांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा ठाम संदेश दिला. रक्षाताई खडसे यांच्याविषयी करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला.

महिलांच्या सन्मानाचे रक्षण करणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असून, अशा प्रकारच्या वक्तव्यांविरोधात समाज एकसंघ असल्याचा संदेश या शांततापूर्ण मूक मोर्चातून देण्यात आला. मोर्चा नियोजित वेळेवर सुरू झाल्यामुळे अनेक नागरिकांना वेळेत पोहोचता आले नाही.त्यामुळे काहींना मोर्चामध्ये निवेदन दिल्यानंतर सहभागी होणाऱ्यांची संख्या सुद्धा जास्त होती हे विशेष.


