शिक्षकी पेशाला काळीमा : सरकारी शाळेचे शिक्षकच ठरले भक्षक!
शाळकरी मुलीवर तिघांनी केला सामूहिक बलात्कार
लोकशाही न्यूज नेटवर्क
गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला कलंक लावणारी घटना समोर आली आहे. तामिळनाडूमधील कृष्णगिरी जिल्ह्यात एका सरकारी शाळेत तीन शिक्षकांनी १३ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. मुलगी शाळेत का आली नाही? हे पाहण्यासाठी हेडमास्तर घरी पोहचल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
१३ वर्षांच्या मुलीच्या पालकांनी शाळेच्या हेडमास्तराला आपल्या मुलीसोबत घडलेला दुर्दैवी प्रकार सांगितला, त्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. हेडमास्तरांनी त्याच दिवशी तात्काळ पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली. त्याचवेळी तपास सुरू झाला. शाळेतील इतर विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. आणखी कोणत्या मुलीसोबत असा प्रकार घडलाय का? याचा शोध घेतला जातोय.
१३ वर्षीय मुलीसोबत एका शिक्षाकाने आधी दुष्कर्म केले. त्यानंतर इतर दोन सहकारी शिक्षकांना याबाबत सांगितले. त्यानंतर त्या तीन जणांनी पुन्हा त्या १३ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. या धक्कादायक घटनेनंतर तामिळनाडूमधील सरकारी शाळेचा प्रश्न ऐरणीवर आलाय, पालकांमध्ये तीव्र संताप आहे. पोलिसांकडून या प्रकारणाचा तपास सुरू आहे.
लोकांच्या तीव्र संतापानंतर पोलिसांकडून तिन्ही नराधम शिक्षकाचा कसून शोध घेण्यात आला. कृष्णनगरीचे एसपी पी थंगदुराई यांच्या अध्यक्षतेखालील पथकाने तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोक्सो कायद्याअंतर्गत तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. शाळेकडूनही त्या तिन्ही शिक्षकांना सस्पेंड करण्यात आलेय.
पीडित मुलीचे कुटुंबिया, नातेवाईक अन् शेजाऱ्यांनी बुधवारी शाळा आणि परिसरात आंदोलन करत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. पीडित मुलीला कृष्णनगरी सरकारी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. सध्या मुलीची प्रकृती स्थिर आहे. आरोपींना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.