गोसेवक : बापूराव मांडे

0

गोसेवक : बापूराव मांडे
सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या यावल तालुक्यातील हरिपूरा येथील खडकाळ जमिनीवर नंदनवन फुलविणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा गो सेवक बापूराव मांडे यांचे काल पहाटे निधन झाले. त्यांच्या कार्याविषयी….

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले बापूराव मांडे यांनी समाजाचे काही देणे लागतो या उद्दात्य भावनेतून भुसावळ शहरात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. ‘जनम जनम का नाता है, गो हमारी माता है!’ या ब्रीद वाक्याने त्यांनी गोशाळा उभारण्याची विचार मनी बाळगला आणि यावल तालुक्यातील हरिपूरा या सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या छोट्याशा गावात गो अनुसंधान ही बहुउद्देशीय संस्था स्थापन केली. मागासलेपण जावून प्रत्येकाने शिक्षणाच्या प्रवाहात यावे या हेतूने त्यांनी विविध शैक्षणिक संस्थांची निर्मिती करतांना त्यातून संस्कारक्षम पिढी घडविण्यावर भर देत समाजाची सेवा केली.

दिद्वत्वं च नृपत्वं, च नैव तुल्यं कदाचन।
स्वदेशे पुज्यते राजा, विद्वान्‌ सर्वत्र पूज्यते॥

या सुभाषिताप्रमाणेच खान्देशच्या मातीवर निस्सीम प्रेम करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेले श्री. प्रभाकर मुरलीधर उपाख्य बापूराव मांडे यांनी समाजाला नवी दिशा देण्याचे महान कार्य केले आहे. श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ मुक्ताई शिशू मंदीर, जिजामाता प्राथमिक विद्यालय, अहिल्यादेवी कन्या विद्यालय, महाराणा प्रताप विद्यालय हिंदूसभा न्यास, भुसावळ तसेच आश्रमशाळा हरिपुरा, गोविज्ञान केंद्र हरिपूरा असा मोठा परिवार त्यांनी आपल्या हयातीत यशस्वीपणे उभारला आहे. अनेक कार्यकर्त्यांना संस्कारक्षम घडविण्यात बापूरावांचा सिंहाचा वाटा आहे. शिक्षण, समाज आणि निसर्गावर प्रेम करणे हे बापूरावांचे ब्रीद होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह मा.श्री भैयाजी जोशी यांच्याशी झालेल्या चर्चेतून गोशाळा प्रकल्प उभारण्याचा निश्चय केला आणि तो यशस्वी देखील करुन दाखविली. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या हरिपूरा या इवल्याश्या गावात गो अनुसंधान संस्था उभे करणे साधे-सुधे कार्य मुळीच नव्हते. मात्र इच्छाशक्तीच्या बळावर बापूरावांनी ते करुन दाखविली. खडकाळ जमिनीवर नंदनवन फुलविणारे ते खरेखुरे गोसेवकच ठरले.

त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने सन 2009 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. 2013 मध्ये कृषीभूषण पुरस्कार देऊन त्याचा गौरव केला जोपर्यंत आपण एखादी गोष्ट स्वत:च्या डोळ्यानी बघत नाही तोपर्यंत त्यावर विश्वास ठेवण अवघड असते याची जाणीव बापूरावांना असल्यामुळे त्यांनी निसर्ग आणि पर्यावरण संवर्धनाचा फक्त संदेशच दिला नाही तर त्या अनुषंगाने प्रत्येक गोष्टीत भरीव काम करून एक आदर्श वस्तूपाठ सर्वांसाठी निर्माण केला. जलसंधारण, कृषी आणि कृषीपूरक व्यवसाय वृक्ष संवर्धन, निसर्ग संवर्धन, आणि या सगळ्याला शिक्षणाची जोड दिली अशा अनेक क्षेत्रांना बापूरावांच्या कार्याचा आणि विचारांचा परिसस्पर्श झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.