चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क
तालुक्यातील गोरगावले बुद्रुक रस्त्यालगत हतनुरच्या कालव्यावरील अरूंद पुलाने आत्तापर्यंत अनेकांचा बळी घेतलेला असुन दिवसागणिक अपघातांची मालिका सुरूच आहे. म्हणून ह्या पुलांची रूंदी वाढविण्यात यावी, अशी मागणी गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी पत्रकान्वये केली आहे.
गोरगावलेचा रस्ता नविन बनविण्यात आलेला असुन रस्ता मोठा व वळणावरील पाटाचा पुल लहान अशी परिस्थिती असल्याने मोठे वाहन जात असतांना लहान वाहनांना थांबुन रहावे लागते. दिवसा व रात्री अपरात्री या पुलांवरून वळण घेताना सायकलस्वार, मोटरसायकल, गाडीबैल, फोरव्हिलर, मालट्रक, ट्ट्रॅक्टर आदींचे अपघात होऊन काहीजण थेट कालव्यात पडल्यामुळे त्यांना आपला जीवही गमवावा लागला आहे. यासाठी ह्या पुलांची रूंदी त्वरित वाढविण्यात यावी, अशीही मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे.
अरुंद रस्तापुल वळणावर असल्याने अपघात होतात
हतनुर कालवा बांधकामाच्या वेळेस अस्तित्वात असलेल्या मानांकानुसार रस्तापुलाचे काम झालेले आहे. आता हा रस्ता राज्यमार्ग जिल्हामार्ग झाल्याने रस्त्याची रूंदी वाढली पण वळणावरिल पुलांची रुंदी कमीच असल्याने याठिकाणी अपघात होत आहेत. जळगाव पाटबंधारे विभागातर्फे सा. बां. विभागाकडे ह्या रस्तापुलांची रुंदी वाढविणेसह याठिकाणी स्पिडब्रेकर रिपलेक्टर साईनबोर्ड बसविणेबाबतचे पत्र दिले असल्याचे सांगीतले आहे. हे काम जलदगतीने झाले पाहिजे यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे.