मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ झालेली पाहायला मिळत आहे. ऐन सणासुदीच्या काळात सोने 80 हजाराच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. जागतिक पातळीवर घडत असलेल्या घडामोडींचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज सोने आणि चांदी हे दोन्हीही मौल्यवान धातू महागले आहेत. आजच्या भाववाढीनंतर सोने आणि चांदीचा भाव उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.
आज सोमवारी सोन्याच्या दरात प्रति तोळा 450 रुपयांची वाढ पाहायला मिळाली. आता सोन्याचा दर 78170 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. चांदीमध्येही आज मोठी तेजी पाहायला मिळाली. आज चांदीच्या दरात प्रतिकिलोमागे दोन हजार आठशे रुपयांची वाढ झाली. सोन्याच्या भावात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. या वाढीसह सोने रोज नवनवे रॉकर्ड रचत आहे. सोमवारी सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. भारतात सध्या सणासुदीचा काळ आहे. या काळात भारतीय मौल्यवान दागिने खरेदी करतात. सोने आणि चांदी या धातूंची या काळात मोठ्या प्रमाणात विक्री होते असे असताना आता सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे फक्त भारतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील सोने आणि चांदीच्या भावात सातत्याने वाढ होताना दिसत आहे.
सोने 85 हजारांपर्यंत जाणार !
गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना वर्षभरात 29 टक्के रिटर्न्स मिळालेले आहेत. या वर्षी 15 ऑक्टोबर पर्यंत सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना 21 टक्के रिटर्न्स मिळाले आहेत. येत्या 29 ऑक्टोबरपासून दिवाळी पर्वाला सुरुवात होत आहे. त्यामुळे या काळात सोन्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. 29 रोजी धनतेरस आहे. त्या दिवशी लोक मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतात. भाऊबीज, दिवाळी या सणांच्या मुहूर्तावरही लोक सोने खरेदी करतात. त्यामुळे आगामी काळात सोन्याची मोठी खरेदी होण्याची शक्यता आहे.