स्वस्तात दागिने खरेदीची ग्राहकांना ‘सुवर्णसंधी’!
सोन्या चांदीच्या दरात घसरण सुरुच : आयात शुल्क झाले कमी
नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क
केंद्रीय अर्थसंकल्पात सोन्या- चांदीवरील कस्टम ड्युटी (आयात शुल्क) कमी करण्यात आल्यापासून मौल्यवान धातूच्या किंमतीत घट सातत्याने घट नोंदवली जात आहे इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, शुक्रवारी सोन्याचा दर 68 हजार 227 रुपये झाला तर चांदीचा दर 81 हजार 474 रुपये प्रति किलोवर उपलब्ध आहे. शुक्रवारी बाजाराच्या सुरुवातीला पुन्हा एकदा सोन्या आणि दरात बदल झाल्याचे पाहायला मिळाले असून खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार सोने-चांदीच्या दरातही बदल झाला असून मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरही सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तुम्हीपण सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे कारण वर्षभरात सोने इतके स्वस्त झाले नाही तेवढे गेल्या तीन दिवसात झाले आहेत. सोन्याचा ऑगस्ट वायदा शुक्रवारी 267 रुपयांनी वाढून 67,729 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. अर्थसंकल्पानंतर लगेचच सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आणि झटक्यात सोन्याचा भाव प्रति तोळा 4 हजार रुपयांनी घसरला. गेल्या वर्षभरातील ही सर्वात मोठी घसरण होती तर आजही सोन्याच्या दरात प्रति तोळा एक हजार रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे.
सोन्या-चांदीची झळाळी कमी झाली
सीमा शुल्क कपातीचा मोठा परिणाम देशांतर्गत सराफा बाजारात दिसून आला असून ग्राहकांना स्वस्तात धातू खरेदीची संधी मिळाली आहे. शुक्रवारी सकाळच्या सत्रात सोन्याची स्वस्ताई आणखी वाढली असून गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 64 हजार 150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 69 हजार 950 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. त्याच वेळी किलोभर चांदीसाठी ग्राहकांना 84 हजार 500 रुपये खर्च करावे लागतील.
सोन्या-चांदीचे फ्युचर्स महागले
एकीकडे सराफा बाजारात सोने-चांदीचे दर कमी झाले तर दुसरीकडे वायदे दरात मात्र पुन्हा एकदा दरवाढ नोंदवली जात आहे. गुरुवारी सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण झाल्यानंतर शुक्रवारी, आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी सुधारणा दिसून येत असू दोन्ही मौल्यवान धातूच्या फ्युचर्स किंमतीत वाढ झाली आहे.