
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत असून, गुंतवणूकदारांसह ग्राहकांचे लक्ष पुन्हा एकदा मौल्यवान धातूंवर केंद्रित झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चढ-उतारानंतर आता दरांमध्ये लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोन्याच्या दरात तब्बल १ हजार रुपयांची वाढ झाली असून, जीएसटीसह सोन्याचा दर १ लाख ५५ हजार १५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्याचप्रमाणे, चांदीच्या दरातही मोठी उसळी दिसून आली असून, चांदीचा दर ५ हजार रुपयांनी वाढून जीएसटीसह २ लाख ५२ हजार ३५० रुपयांवर पोहोचला आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा स्थानिक बाजारावर परिणाम होत असल्याचे सराफ व्यावसायिकांचे मत आहे. विशेषतः अलीकडे जाहीर झालेल्या युद्धविरामानंतर जागतिक बाजारपेठेत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे सोन्या-चांदीच्या दरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सतत चढ-उतार सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
तज्ज्ञांच्या मते, अशा परिस्थितीत गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्या-चांदीकडे वळत आहेत. त्यामुळे मागणी वाढून दरात वाढ होत आहे. आगामी काळातही आंतरराष्ट्रीय परिस्थितीनुसार दरात आणखी बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य ग्राहकांवर आर्थिक ताण येण्याची शक्यता असून, सणासुदीच्या पार्श्वभूमीवर खरेदीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ग्राहक सध्या खरेदीबाबत सावध भूमिका घेत असल्याचेही दिसून येत आहे.

