गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असून दोन्ही मौल्यवान धातूंनी ऑलटाइम हायचा टप्पा गाठला आहे. या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य ग्राहकांसाठी दागिन्यांची खरेदी अधिकच महाग होत चालली आहे. तरीही सोन्या-चांदीच्या दरवाढीचा वेग अद्याप थांबलेला दिसत नाही.
आज, सोमवार 27 जानेवारी रोजी देशांतर्गत वायदा बाजारात चांदीच्या दरात लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली. goodreturns संकेतस्थळानुसार, चांदीच्या दरात तब्बल 10 हजार रुपयांची वाढ झाली असून एक किलो चांदीचा भाव थेट 3 लाख 70 हजार रुपयांवर पोहोचला आहे. दुसरीकडे, सोन्याच्या दरात आज कोणताही बदल दिसून आलेला नाही.
सध्या 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 1 लाख 61 हजार 950 रुपये इतका आहे. 22 कॅरेट सोनं प्रति तोळा 1 लाख 49 हजार 150 रुपयांवर स्थिर आहे, तर 18 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 22 हजार 030 रुपये प्रति तोळा इतका नोंदवण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर ऐतिहासिक उच्चांकावर असल्याने आज दर स्थिर राहिल्याचा फायदा दागिने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना होऊ शकतो. मात्र, हे दर जीएसटी (GST) आणि मेकिंग चार्जेस वगळून असल्याची नोंद घ्यावी, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

