सोन्याला पुन्हा तेजी, चांदीने गाठला सर्वकालीन उच्चांक; दिवाळीपर्यंत दर आणखी वाढणार?
प्रतिनिधी | जळगाव
पंधरा दिवसांच्या सततच्या चढ-उतारांनंतर सोन्याच्या दरात पुन्हा तेजी परतली आहे. शुक्रवारी झालेल्या घसरणीनंतर शनिवारी सोन्याने तब्बल १,३३९ रुपयांची वाढ नोंदवत तोळा १,२७,५१४ रुपयांवर पोहोचला. तर चांदीच्या दरात तब्बल ३,०९० रुपयांची भर पडून ती १,७३,०४० रुपयांचा सार्वकालीन उच्चांक गाठला आहे.
२६ सप्टेंबरपासून सोन्याच्या बाजारात वाढीचा कल सुरू झाला होता. मात्र शुक्रवारी १,१३३ रुपयांची घसरण होऊन दर १,२६,१७५ रुपयांवर आला होता. त्यानंतर शनिवारी पुन्हा वाढ झाल्याने सोन्यानेही आपला नवा उच्चांक गाठला. विशेष म्हणजे, शुक्रवारी सोन्यात घसरण असताना चांदीत मात्र १,०३० रुपयांची वाढ झाली होती.
चांदीचा वापर औद्योगिक, धार्मिक आणि दैनंदिन वस्तूंमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असल्याने तिची मागणी वाढत आहे. पण पुरवठा मर्यादित असल्याने बाजारात ‘फिजिकल सिल्व्हर’ची टंचाई निर्माण झाली आहे. वितरण शृंखला विस्कळीत झाल्यानेही दरवाढीस चालना मिळाल्याचे स्थानिक व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, सध्याच्या वाढत्या मागणी आणि मर्यादित पुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर दिवाळीपर्यंत चांदी प्रतिकिलो २ लाख रुपयांचा टप्पा ओलांडेल, असा अंदाज सोनार संघटनांनी व्यक्त केला आहे. तर सोन्याचे दरही स्थिर वाढीच्या दिशेने जात असून, गुंतवणूकदारांसाठी हा काळ महत्त्वाचा ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.