जळगाव लोकशाही न्यूज नेटवर्क
आजची पिढी तंत्रज्ञानामुळे अपडेट असून पालकांपेक्षा पाल्याला करिअरचे अनेक पर्याय माहिती आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या पाल्याच्या करियरची काळजी करण्यापेक्षा त्याला चांगला माणूस बनवण्यासाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन करियर समुपदेशक गिरीश कुलकर्णी यांनी केले.
रोटरी भवन येथे रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टतर्फे ‘करिअरची निवड… यशस्वी जीवनाचा पाया’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्ष विनीत जोशी, प्रशासकीय सचिव भद्रेश शाह यांची प्रमुख उपस्थिती होती.
गेल्या चार दशकात ऐकणारी, नंतर चर्चा करणारी, त्यापुढे वादविवाद करणारी व आता स्पष्ट नकार देणारी अशा चार पिढ्यांचे स्थित्यंतर झाल्याचे सांगून कुलकर्णी यांनी मुलांना काही कळत नाही हा समज पालकांनी काढून मोकळ्या पद्धतीने त्यांच्याशी चर्चा करावी असे सांगितले.
आपले स्वप्न, इच्छा विसरून मुलांची क्षमता, संधी यांचा करिअरचे नियोजन करताना विचार करावा. करिअरचा क्षमता व कल यांचा जवळचा संबंध आहे. डिमांड अर्थात मागणी एखाद्या कोर्सला किंवा अभ्यासक्रमाला नव्हे तर व्यक्तीमधील कौशल्याला असते असे त्यांनी सांगितले.
करिअरमधून ओळख, प्रतिष्ठा, पैसा, समाधान व आनंद या पाच गोष्टी मिळाल्या पाहिजे असे सांगून आजची पिढी वेब सिरीजच्या आधीन झाली असल्यामुळे पालकांनी चारित्र्य बांधणी करून मुलांना चांगला माणूस बनवावे असे शेवटी आवाहन केले. परिचय रोटरॉक्ट क्लब ऑफ जळगाव वेस्टचे प्रेसिडेंट कुशल चौधरी यांनी तर आभार समकित मुथा यांनी मानले. उपस्थितांच्या प्रश्नांना गिरीश कुलकर्णी यांनी उत्तरे दिली.